मराठवाडा, विदर्भात पावसाची हजेरी पुढील दोन दिवसांत तापमान वाढीची शक्‍यता

मुंबई – मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. तसेच पुढील दोन दिवसांत राज्यात सर्वत्र कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार असल्याने दिवसाच्या तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे.

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्राच्या प्रभावामुळं विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्‍यता आहे. विदर्भ, मराठवाड्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्याचबरोबर नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगावसह इतर काही जिल्हांत देखील पावसाची शक्‍यता आहे. परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर आणि गडचिरोली, भंडारा गोंदिया, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात शनिवारी जोरदार पावसाने हजेरी लावली. अकोला जिल्ह्यातल्या तेल्हारा तालुक्‍यातील दानापूर भागात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या. तर दहा दिवसांच्या उघडीपनंतर वाशिम जिल्ह्यात परतीच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. परतीच्या पावसामुळे काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे. तसेच, बुलढाणा जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव, संग्रामपूर, मोताळा, लोणार आणि मेहकर तालुक्‍यात परतीच्या पावसाने हजेरी लावली.

चंद्रपूर शहर आणि जिल्ह्यात सर्वत्र पावसाने हजेरी लावली. चंद्रपूर जिल्ह्यात रात्रीपासूनच ढगाळ वातावरण होते. त्यानंतर दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे सोयाबीन, कापूस आणि धान पिकाचे नुकसान होण्याची शक्‍यता आहे.

ब्रह्मपुरी उच्चांकी तापमानाची नोंद
राज्यात अनेक ठिकाणी सध्या तापमानात वाढ होत आहे. एक ते दोन दिवस काही भागांत पावसाळी स्थिती राहणार आहे. त्यानंतर हवामान कोरडे होईल. उत्तरेकडील राज्यात दोन दिवस पाऊस होणार असून, तेथेही नंतर कोरड्या हवामानाची स्थिती निर्माण होणार आहे. परिणामी राज्यातील काही भागात दिवसाच्या कमाल तापमानात आणखी काही प्रमाणात वाढ होण्याची शक्‍यता आहे. शनिवारी राज्यातील उच्चांकी कमाल तापमान ब्रह्मपुरी येथे 36.5 अंश सेल्सिअस नोंदविले गेले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.