सहाय्यक आयुक्‍तांना बदलीचे अधिकार

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवरील चतुर्थ श्रेणीतील शिपाई आणि मजूर या पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार प्रशासन विभागाच्या सहायक आयुक्‍तांना देण्यात आले आहेत. महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी हा आदेश जारी केला आहे. प्रशासकीय कामकाजात अधिक गतिमानता यावी, या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सरकारी कर्तव्य पार पाडताना होणाऱ्या विलंबास प्रतिबंध नियम 2013 नुसार अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. महाराष्ट्र महापालिका अधिनियमातील कलम 72 मध्ये आयुक्‍त हे त्यांच्या हाताखाली काम करणाऱ्या दुय्यम अधिकाऱ्यांकडे अंतिम निर्णय घेण्यासाठी सोपविण्यात आलेल्या अधिकारांची यादी प्रसिद्ध करतील, अशी तरतूद आहे. त्यानुसार कार्यालयीन कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने विभागप्रमुख गट “अ’ आणि गट “ब’ च्या अधिकाऱ्यांना 29 ऑगस्ट 2013 आणि 2 जानेवारी 2016 रोजीच्या आदेशानुसार प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार प्रदान करण्यात आले आहेत.

महापालिका प्रशासनाचे कामकाज सुरू असताना त्यामध्ये अधिक गतिमानता येण्यासाठी आणि प्रशासकीय कामकाज कार्यक्षमपणे पार पाडण्याच्या दृष्टीने काही अधिकार प्रदान करणे आवश्‍यक होते. त्यानुसार महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांनी चतुर्थ श्रेणीतील शिपाई आणि मजूर या पदांवरील कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे अधिकार प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्‍तांना दिले आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.