पिंपरी, दि. 15 – पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट (पीसीईटी) संचलित पिंपरी चिंचवड विद्यापीठास नुकत्याच झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. पुणे मुंबई महामार्ग लगत साते वडगांव मावळ येथे हे विद्यापीठ उभारण्यात आले असून पुढील शैक्षणिक वर्षापासून म्हणजे जून 2023 पासून प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची माहिती संस्थेच्या वतीने देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विद्यापीठास मंजुरी देण्यात आली. पीसीईटीने स्वयं अर्थसहाय्य विद्यापीठ मान्यतेसाठी उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे प्रस्ताव सादर केला होता.
32 वर्षांपासून कार्यरत असलेल्या पीसीईटी साते, वडगांव मावळ येथे 10 एकर विस्तीर्ण क्षेत्रात हे विद्यापीठ उभारले आहे. या ठिकाणी जून 2023 पासून सुरू शैक्षणिक अभ्यासक्रम सुरू होणार आहे. पीसीईटीच्या शैक्षणिक संस्थांमधून मॅनेजमेंट, अभियांत्रिकी, आर्किटेक्चर, तंत्रनिकेतन, विविध विषयांचे व्यावसायिक पदवी अभ्यासक्रम तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळा, महाविद्यालय अशा शैक्षणिक अभ्यासक्रमांची अद्ययावत व्यवस्था आकुर्डी, रावेत, तळेगाव परिसरामध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. संस्थेतील विद्यार्थ्यांनी सुमारे 250 कॉपीराइट्स आणि 450 पेटंट्स मिळवले. त्याची ‘लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये दखल घेतली. डिजिटल क्लासरूम’ वाय-फाय कॅम्पस लायब्ररी, अद्ययावत प्रयोगशाळा, सर्व संगणक प्रणाली, ईआरपी यंत्रणा अशा सुसज्ज शैक्षणिक सुविधा आहेत. विद्यार्थी – विद्यार्थिनींसाठीची स्वतंत्र वसतिगृह, मेस, विद्यार्थ्यांसाठी बस व्यवस्था या आवश्यक बाबी देखील अनेक वर्षांपासून उपलब्ध आहेत. ‘एआयसीटीई’, ‘डीटीई’, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आदी उच्चस्तरीय यंत्रणांच्या नियंत्रणाखाली शैक्षणिक प्रगती करतानाच ‘एनआयआरएफ’ रॅंकिंग मध्ये सलग चार वर्षे भारतातील पहिल्या 200 क्रमांकात स्थान, नॅक, एनबीए, आयएसओ अशा नामांकनाच्या वरच्या दर्जाने संस्थांना प्रमाणित करण्यात आले आहे.
2021-22 मध्ये 61 लाखांचे सर्वाधिक प्लेसमेंट मिळाले आहे. मागील वर्षी केंद्र सरकारने पीसीईटीला देशातील ‘उत्कृष्ट कॅम्पस’ म्हणून सन्मानित केले. संस्था विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देते त्यामुळे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थी पालकांकडून प्रथम प्राधान्यक्रम दिला जातो.
पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, सचिव विठ्ठल काळभोर, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या प्रयत्नाने पिंपरी चिंचवड विद्यापीठास मान्यता दिल्याची घोषणा होताच ट्रस्टने मुख्यमंत्री, उच्च तंत्र शिक्षणमंत्री आणि राज्य सरकारचे अभिनंदन केले. या मान्यतेमुळे पीसीईटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे त्यामुळे पदाधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.