पाथर्डी, प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक, सण, उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पाथर्डी पोलीस स्टेशनच्या वतीने सोमवारी सकाळी शहरातून पोलिसांनी पथसंचलन करून केले. सध्या सण, उत्सव व लोकसभेची निवडणूक सुरू असून, त्याअनुषंगाने पाथर्डी तालुक्यात शांतता प्रस्थापित राहण्यासाठी सीमा सुरक्षा दलाचे पोलीस जवान व पाथर्डी पोलीस यांनी पाथर्डी शहरातून पथसंंचालन करून शक्तीप्रदर्शन केले.
शहर व तालुक्यात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पाथर्डी पोलीस स्टेशनचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून पथसंचलन करण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी तांबे, पोलीस उपनिरीक्षक सचिन लिमकर, निवृत्ती आगरकर, पोलिस कॉन्स्टेबल भगवान सानप हे या पथकात सहभागी झाले होते.
कायदा व्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज आहे, हे दाखवण्यासाठी सीमा सुरक्षा दल पोलिसांचे विशेष पथक पाथर्डी शहरात दाखल होऊन प्रमुख रस्त्यावरून पथसंंचालन केले गेले. शहरातील मुख्य नाईक चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, नवीपेठ, क्रांतीचौक, अजंठा चौक, मेनरोड आदी भागातील रस्त्यांवर पोलिसांनी पथसंचालन केले.
त्याचप्रमाणे मढी व तिसगाव या ठिकाणीही पथसंचलन केले. निवडणुकी व सणाच्या काळात कायदा सुव्यवस्था हातात घेणाऱ्या तसेच गोंधळ करणाऱ्या लोकांवर पोलिसांचा धाक असावा, यासाठी हे संचलन करण्यात आले. निर्भय वातावरणात येणाऱ्या निवडणुका व सण, उत्सव पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज असून या काळात अडथळा अथवा व्यक्त आणून गुन्हा करणाऱ्या व्यक्तींवर पोलीस कडक कारवाई करणार आहे. लोकसभा निवडणूक व सण, उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस दलाला सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी केले आहे.