पुणे – पुणे महापालिका परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचा एक तुकडा खाली पडल्याचे आढळले आहे. एक दिवस आधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आले आहे. त्यामुळे यावरून राजकारण तापणार अशी शक्यता आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले की, “मोठा गाजावाजा करुन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महापालिका परिसरात पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करुन घेतले.
परंतु श्रीपाद छिंदम असो की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी भाजपाचा शिवरायांबाबतचा आकस सातत्याने दिसून आला असून मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव अशी भाजपाची अवस्था झाली आहे.
परिणामी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरील मेघडंबरीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाल्याचे आढळून आले असून उद्घाटनाचा अजून मंडपही हटला नसताना मेघडंबरीचा तुकडा खाली पडला आहे.”
देशमुख पुढे म्हणाले की, “भाजपाने अतिशय घाईघाईने शिवरायांच्या पुतळ्याचे काम केले असून केवळ मोदींच्या पुढे चमकोगिरी करण्यासाठी दर्जेदार काम करुन घेतले नाही, हेच यातून सिद्ध झाले आहे.”
केवळ निवडणुका जिंकण्यासाठी छत्रपती शिवरायांचे नाव घेतात पण त्यांना शिवरायांबाबत किंचितही आपुलकी नाही असेही ते देशमुख म्हणाले.