बॅंकॉक :- भारताची नवोदित महिला तिरंदाज परणीत कौर हीने आपलीच देश सहकारी खेळाडू ज्योती सुरेखा वेन्नमचा पराभव करत आशियाई तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली.
या स्पर्धेत परणीतने ज्योती आणि महाराष्ट्राच्या आदिती स्वामीसह खेळताना महिला सांघिक गटातही देशाला सुवर्णपदक प्राप्त करुन दिले. आदितीने प्रियांशच्या साथीने खेळताना मिश्र सांघिक गटातही एक सुवर्णपदक पटकावले.
Parneet Kaur triumphs as the 2023 ASIAN CHAMPION! 🏆🥇🇮🇳#ArcheryAsia #archery @india_archery pic.twitter.com/wdyWRGJLW8
— World Archery (@worldarchery) November 9, 2023
कम्पाऊंड प्रकारात भारताने तीन सुवर्ण, एक रजत तर, तीन ब्रॉंझपदकांची कमाई केली. कम्पाऊंड प्रकारात महिलांच्या वैयक्तिक गटाच्या अंतिम लढतीत परणीत व ज्योती यांच्यात प्रत्येकी 145 गणांची बरोबरी झाल्याने टायब्रेकर खेळवण्यात आला. ज्योतीला टायब्रेकरमध्ये अपयश आले व अंतिम शूट-ऑफमध्ये परणीतने 9-8 असे वर्चस्व मिळवत आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील पहिलेच वैयक्तिक सुवर्णपदक पटकावले.
मिश्र सांघिक गटाच्या अंतिम लढतीत साताऱ्याच्या आदिती स्वामीने प्रियांशच्या साथीने खेळताना थायलंडच्या जोडीला 156-151 अशा फरकाने पराभूत करताना सुवर्णपदक प्राप्त केले. आदिती, ज्योती आणि परणीत यांनी महिला सांघिक गटाच्या अंतिम लढतीत तैपेयीच्या संघावर 234-233 अशी अवघ्या एका गुणाने मात करत सुवर्णपदक जिंकले. रीकर्व्हमध्ये मात्र, भारतीय तिरंदाजांना अपयश आले. भारताचा एकही पुरुष खेळाडू उपांत्यपूर्व फेरीही गाठू शकला नाही.