पुणे – शहरात करोनाचे संकट कायम आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली शाळांकडून शुल्क वसूल केले जात आहे. शाळांची काहीच खर्च होत नसताना शुल्क वसुली करणे अन्यायकारक आहे.
त्या विरोधात बालगंधर्व चौकात पुणे पेरेन्ट्स युनायटेड या पालकांच्या मंचामार्फत रविवारी रस्त्यावर उतरून आंदोलन केले व नवा शुल्क नियंत्रण अध्यादेश काढण्याची मागणी केली.
करोना संकटामुळे पालकांचे आर्थिक नियोजन कोलमडले आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने पालकांकडून शुल्क वसुलीची सक्ती करू नये, असे आदेश दिले.
मात्र, एका संस्थेने न्यायालयात धाव घेत शुल्कवाढीला स्थगिती मिळविली. त्यावरून शाळांकडून पुन्हा शुल्क वसुली केली जात आहे. काही ठिकाणी मुलांना शाळेतून काढून टाकू, असे सांगत शुल्क घेतले जात असल्याचे निदर्शनास येत आहे.