मुंबई – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंहांवर आज दुसरे अजामीनपात्र अटक वॉरंट बजावण्यात आले आहे. गोरेगाव येथे नोंदवण्यात आलेल्या खंडणीच्या कथित प्रकरणी हे वॉरंट बजावण्यात आले आहे.
सिंह यांच्याविरोधात या आठवड्यात बजावण्यात आलेले हे दुसरे अजामीनपात्र वॉरंट आहे. यापूर्वी मंगळवारी ठाण्यातील न्यायालयाने सिंहांविरोधात खंडणीच्या एका अन्य प्रकरणी अजामीनपात्र वॉरंट बजावलेले आहे.
या प्रकरणाच्या तपासासाठी परमबीर सिंहांना बजावण्यात आलेल्या समन्सला सिंह यांनी कोणतेही प्रत्युत्तर दिले नाही. म्हणून हे वॉरंट काढावे लागले असे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने म्हटले आहे. परमबीर सिंह यांच्या निवासस्थानी आणि चंदिगड येतील मूळ पत्त्यावरही हे वॉरंट बजावण्यात आले आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
उद्योजक विनय सिंह आणि गॅंगस्टर रियाझ भट्टी यांच्या विरोधातही वॉरंट बजावण्यात आले आहे. सिंह यांच्या व्यतिरिक्त बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक सचिन वाझे देखील खंडणीच्या प्रकरणातील आरोपी आहे. परमबीर सिंह आणि अन्य काही जणांविरोधात बांधकाम आणि हॉटेल व्यवसायिक बिमल अगरवाल यांनी खंडणीची तक्रार दाखल केली आहे.
उद्योजक मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटकांनी भरलेली कार ठेवली जाणे आणि नंतर सचिन वाझे यांना झालेल्या अटकेनंतर परमबीर सिंह यांना मार्च 2021 मध्ये मुंबई पोलीस आयुक्त पदावरून हटवण्यात आले आहे. त्यानंतर सिंह यांनी राज्याचे तत्कालिन गृहमंत्री अनिल देशमुखांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत.