पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – गुढीपाडव्यानिमित्त हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात मंगळवारी शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी ८.३० वाजता शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यामध्ये पारंपरिक वेशात पुणेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर आणि सहसंयोजक अश्विन देवळणकर यांनी दिली.
लोकमान्य टिळक पुतळ्यापासून शोभायात्रेला प्रारंभ होणार असून तुळशीबाग राम मंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे समारोप होणार आहे. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले उपस्थित राहणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांच्या घराण्यातील वंशजांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार आहे.
प्रबोधन मंच रथ, भजनी मंडळ, पद्मश्री पुरस्कार मिळालेल्या विविध महिलांवर आधारित मातृशक्ती रथ, प्रभू श्रीराम रथ, छत्रपती शिवाजी महाराज रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, मर्दानी खेळ, वेत्रचर्म पथकही सहभागी होणार आहेत. मतदानाचे महत्व पटवून देत मतदान जनजागृतीकरिता विशेष रथ देखील शोभायात्रेत सहभागी होणार आहे. पुणेकरांनी भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.