सोलापूर – करोना महामारीमुळे जवळपास 20 महिने पंढरपूरमध्ये यात्रा भरविण्यावर निर्बंध होते. मात्र आता संसर्ग कमी झाल्याने सर्व व्यवहार सुरळीत होत असताना यंदाची कार्तिकी यात्रा भरविण्यास मान्यता देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मिलिंद शंभरकर यांनी करोनाविषयक सर्व नियमांचे पालन करत यात्रा भरविण्यास परवानगी दिली आहे.
याबाबत सविस्तर आदेश जिल्हाधिकारी यांनी पारित केला असून यात पंढरपूर प्रांताधिकारी यांनी सादर केलेल्या प्रस्तावास परवानगी दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीनेही कार्तिकी यात्रा भरविण्यास मान्यता देण्याची मागणी केली होती. याबाबत सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी शासनास प्रस्ताव पाठवून यात्रा भरविण्याची मागणी समितीच्या बैठकीनंतर केली होती.
करोनामुळे मार्च 2020 पासून एकही यात्रा पंढरपूरमध्ये भरलेली नाही. आता 7 नोव्हेंबरपासून सुरु होत असलेल्या कार्तिकीस परवानगी मिळाली आहे. यामुळे वारकरी संप्रदाय व पंढरपूर मधील व्यावसायिक यांच्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे. आता पंढरीत कार्तिकी यात्रेची तयारी सुरू झाली असून 6 तारखेपासून श्री विठ्ठल व रूक्मिणी मातेचा पलंग काढण्यात आला आहे. देव आता चोवीस तास दर्शनासाठी उभा असणार आहे.
जिल्हाधिकारी यांनी यात्रा भरविताना मंदिरात भाविकांचे दर्शन नियोजन, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते होणारी एकादशीची महापूजा, एकादशीचा रथोत्सव, नैवेद्य, श्री विठ्ठलाच्या पादुकांची मिरवणूक, महाव्दार काला, पंढरपूरला येणाऱ्या दिंड्यांचे नियोजन, मठांमध्ये उतरण्याऱ्या भाविकांची नियमावली, वाळवंटातील परंपरा, आरोग्य, स्वच्छता व पाणी पुरवठा व्यवस्था यासह विविध बाबींबाबत सविस्तर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या आहेत.