संजय धुमाळांच्या बदलीची मागणी; शेवटच्या सभेत पदाधिकारी आक्रमक
सातारा – सातारा पंचायत समितीच्या शुक्रवारी झालेल्या सभेत प्रशासनावर सदस्यांनी टीकेची झोड उठविली. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ सलग दोन सभांना अनुपस्थित राहिल्याने त्यांच्या बदलीची मागणी करण्यात आली. प्रशासनाच्या बेफिकिर कारभाराचा पंचनामा सदस्यांनी केला.
उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांना नारळ द्या, अशी मागणी नामदेव साळुंखे, संजय घोरपडे यांनी केली. रस्त्याच्या कामांच्या कागदपत्रांवर बांधकाम विभागाचे अधिकारी संतोष धोत्रे सह्या करत नसल्याने तालुक्याचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी राहुल शिंदे यांनी केली.
सभापती मिलिंद कदम, उपसभापती जितेंद्र सावंत यांच्या कार्यकाळातील अखेरच्या सभेस प्रभारी गटविकास अधिकारी संजय ढमाळ, जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचे अधिकारी धोत्रे, जितेंद्र सावंत, रामदास साळुंखे, दयानंद उघडे, संजय घोरपडे, अरविंद जाधव, कांचन काळंगे, सरिता इंदलकर, राहुल शिंदे, विद्या देवरे, रंजना जाधव उपस्थित होत्या.
सभेच्या कामकाजाला प्रारंभ होताच रामदास साळुंखे म्हणाले,गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ सलग दोन सभांना अनुपस्थित होते. याबाबत यापूर्वीही त्यांच्याकडे खुलासा मागितला होता; पण त्यांनी अजून उत्तर दिलेले नाही. त्यावर संजय ढमाळ यांनी धुमाळ यांचा खुलासा वाचून दाखवला. त्यावर घोरपडे यांनी आक्रमक पवित्रा घेतला गटशिक्षणाधिकाऱ्यांनी खुलासा देऊन सभागृहाची दिशाभूल केली आहे. त्यांच्या वर्तनामुळे ते सभागृहाला विचारत नाहीत, हे स्पष्ट होते.
चुकीचे काम करून सभागृहात उपस्थित राहायचे नाही, ही त्यांच्या कामाची पद्धत झाली आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. नामदेव साळुंखे म्हणाले, सातव्या वेतन आयोगाची 142 शिक्षकांची कामे मार्गी लावण्याचा निर्णय देऊनही तो निर्णय मान्य न करणे म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान आहे. त्यामुळे संजय धुमाळ यांना नारळ द्या, अशी मागणी त्यांनी केली.
जितेंद्र सावंत म्हणाले, पंचायत समितीच्या सभेमध्ये निवडून आलेले सदस्य रोजंदारीवर येतात का? यापुढे असे घडल्यास गटविकास अधिकाऱ्यावर कडक कारवाई करण्यात येईल. सभागृहातील वातावरण पाहून संजय ढमाळ यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या.
पंचायत समितीचा मासिक सभेला कार्यालयीन कामकाजामुळे उपस्थित राहता येत नसेल तर संबंधित अधिकाऱ्यांनी सभापती आणि उपसभापतींना पूर्वकल्पना द्यावी, असे त्यांनी बजावले. मासिक सभेला अनुपस्थित असलेल्या जीवन प्राधिकरणाच्या संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याचा ठराव एकमताने करण्यात आला. कृषी विभागाच्या आढाव्यात अतिवृष्टीतील नुकसानीबद्दल किती शेतकऱ्यांना अनुदान मिळाले, तालुक्याला किती रुपयांचे मिळाले, याची माहिती सदस्यांनी घेतली.