नवी दिल्ली – पाकिस्तानच्या संसदेचे नवीन अधिवेशन आजपासून सुरू झाले. नव्याने निवडलेल्या संसद सदस्यांनी सदस्यत्वाची शपथ घेतली. अधिवेशन बोलावण्यास राजी नसलेले अध्यक्ष डॉ. आरिफ अल्वी यांनी थोड्या विलंबाने का होईना अधिवेशन बोलावण्यास मान्यता दिल्यावर आज हे अधिवेशन बोलावण्यात आले..
मावळत्या संसदेचे रजा परवेझ अशर्रफ यांंच्या अध्यक्षतेखाली सुमारे तासाभराच्या विलंबाने अधिवेशनाला प्रारंभ झाला. अशर्रफ यांनी नव्याने निवडलेल्या सदस्यांना संसद सदस्यत्वाची शपथ दिली. त्यावेळी पीटीआयच्या सदस्यांनी निवडणुकीतील गैरप्रकारांचा निषेध करणारी घोषणाबाजी केली.
माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पक्षाने पाठिंबा दिलेले अपक्ष सदस्यांना आरक्षित जागा देण्याच्या मुद्यावरून डॉ. अल्वी यांचे काळजीवाहू सरकारबरोबर मतभेद झाले होते. मात्र आज अध्यक्षांनी अधिवेशन बोलावण्याची तयारी दाखवली. निवडणूक झाल्यापासून २१ दिवसात अधिवेशन बोलावणे राज्यघटनेनुसार आवश्यक असल्यामुळे अध्यक्षांनी नमते धोरण स्वीकारले. याबाबत अध्यक्षांच्या कार्यालयाच्यावतीने काल मध्यरात्रीच्या सुमारास एक निवेदन प्रसिद्धीस दिले होते. राखीव जागांच्या नियुक्त्या प्राधान्याने करण्यात याव्यात अशी अपेक्षा डॉ. अल्वी यांनी व्यक्त केली आहे.
अधिवेशनामध्ये सर्वप्रथम नवीन सभापती आणि उपसभापतींची निवड केली जाणार आहे. पंतप्रधानांची निवड शनिवारी केली जाणे अपेक्षित आहे.
आरक्षित जागा मिळवण्याचा पीटीआयच्या अपक्षांचा प्रयत्न
पीएमएल-एन आणि पीपीपी यांच्यात झालेल्या समझोत्यानुसार माजी पंतप्रधान शेहबाझ शरीफ हेच पंतप्रधानपदी निवडले जाणार आहेत, हे निश्चित आहे. पीटीआयच्या पाठिंब्यावर निवड झालेले अपक्ष सुन्नी इत्तेहादुल कौन्सिलमध्ये सामील झाले आहेत. महिला आणि अल्पसंख्यांकांसाठीच्या एसआयसी च्या वाट्यातील जागा मिळाव्यात, हाच यामागील हेतू आहे.