इस्लामाबाद: करोना विषाणूविरोधातील औषध आपण तयार करत नसल्याचे स्पष्टिकरण आज पाकिस्तानच्यावतीने देण्यात आले. चीनच्या मदतीने पाकिस्तान करोनाप्रतिबंधक औषध तयार करत असल्याचे वृत्त पसरले होते. त्यानंतर पाकिस्तानने हे स्पष्टिकरण दिले.
आरोग्य सल्लागार झाफर मिर्झा यांनी आपल्या दैनंदिन वार्तालापादरम्यान हे स्पष्टिकरण दिले. सध्या पाकिस्तानकडे करोना प्रतिबंधक औषध नाही आणि हे औषध बनवण्यासाठी कोणतेही प्रयत्नही केले जात नाही आहे, असे त्यांनी सांगितले. जगभरात काही देशांमध्ये करोना प्रतिबंधक औषधाच्या निर्मितीसाठी चाचण्या सुरू आहेत.
मात्र पाकिस्तानमध्ये तसे कोणतेही प्रयत्न चालले नाहीत.औषध बनवण्याच्या प्रयत्नातील एका चिनी कंपनीने पाकिस्तानला चाचण्यांमध्ये सहभागी होण्याचा प्रस्ताव दिला होता. पाकिस्तानने याबाबत अधिक माहिती मागवली आहे, असे मिर्झा म्हणाले. असाच प्रस्ताव जपाननेही दिला होता आणि पाकिस्तानने जपानकडेही अधिक माहिती मागितली आहे. पाकिस्तानमधील रुग्णांची संख्या आता 12 हजारपर्यंत वाढली आहे.