वॉशिंग्टन – पाकिस्तानी सुरक्षा यंत्रणेतील जवानांना अमेरिकेच्या संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्यास ट्रम्प प्रशासनाने पुन्हा अनुमती दिली आहे. तथापी याचा अर्थ अमेरिकेने पाकिस्तानाला पुन्हा सुरक्षा विषयक सहाय्य सुरू केले आहे असा घेतला जाऊ नये असेही अमेरिकेच्या एका वरीष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.
पाकिस्तानचे विदेश मंत्री माईक पॉम्पओ यांनी काल पाकिस्तानी लष्कराचे प्रमुख जनरल कमर जावेद बाजवा यांना फोन वरून ही माहिती दिली. तसेच त्यांनी या उपविभागातील एकूण सुरक्षा स्थितीची माहिती घेतली. इराणचे मेजर जनरल कासेम सोलिमनी यांची अमेरिकेने रॉकेट हल्ला करून हत्या केल्यानंतर तेथे नव्याने जी तणावाची स्थिती उद्भवली आहे त्या विषयीही पॉम्पओ यांनी जनरल बाजवा यांच्याशी चर्चा केल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.
हा अधिकारी म्हणाला की अमेरिका आणि पाकिस्तान यांच्या लष्करातील सहकार्य आणखी वाढवण्याचा आमचा इरादा आहे. मात्र त्यासाठी प्राधान्य क्रम ठरवला जात आहे असे ते म्हणाले. पाकिस्तानी लष्करी अधिकाऱ्यांना रशियातही प्रशिक्षण देण्याचा प्रयोग सुरू झाल्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानी सुरक्षा जवान आणि अधिकाऱ्यांना अमेरिकेतील संस्थांमध्ये प्रशिक्षण देण्याचे काम थांबवले होते. पण आता मात्र हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्यास ट्रम्प प्रशासनाने अनुमती दिली आहे.