ऑक्सफर्ड- ऍस्ट्रोझेनेकाच्या कोविड लशीची दोन दिवसांपूर्वी थांबवण्यात आलेली चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली आहे. ब्रिटनच्या आरोग्य नियामक प्राधिकरणाकडून मंजूरी मिळाल्यानंतर ही चाचणी पुन्हा सुरू करण्यात आली असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले.
ब्रिटनमध्ये चाचणी घेतली जात असताना एका महिला स्वयंसेवकाची प्रकृती बिघडल्याने चाचण्या थांबवण्यात आल्या होत्या. मात्र भारतात सीरम इन्स्टिट्यूटकडून घेण्यात येत असलेल्या चाचण्या सुरूच होत्या. त्यावरून सीरमला डिसीजीआयने नोटीसही बजावली होती. त्यानंतर सीरमनेही चाचण्या थांबवल्या असल्याचे जाहीर केले होते.
करोनावर लस विकसित करण्यासाठी जगभरात प्रयत्न सुरू असून त्यातील ऑक्स्फर्ड ऍस्ट्रोझेनेकाच्या या लशीकडे सगळ्या जगाचे लक्ष लागले आहे. हीच लस करोनावर रामबाण ठरेल असा विश्वास बहुतेक स्तरावर व्यक्त करण्यात आला असून पुण्यातही या लशीच्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत.