मुंबई – मुंबईच्या डबेवाल्यांनी आपल्या सेवेसाठी लोकलचा वापर करू द्यावा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. सध्या मुंबईत अत्यंत तुरळक प्रमाणात लोकल सेवा सुरू आहे. त्यात काही विशिष्ट लोकांनाच ये-जा करण्याची मुभा देण्यात आली आहे.
डबेवाल्यांच्या संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी सांगितले की सध्या आमचा व्यवसाय काही प्रमाणात सुरू झाला असला तरी आम्हाला लोकलचा वापर करण्याची मुभा नसल्याने आमच्या व्यवसायात अडचणी येत आहेत. हा व्यवसाय सुरळीत करण्यासाठी आम्हाला लोकलचा वापर सुरू करायला अनुमती दिली गेली पाहिजे.
सध्या मुंबईतील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकलचा वापर करण्याची अनुमती आहे. त्यामुळे डबेवाल्यांना लांब अंतरावर सायकलने डबे पोहोचवायला लागत आहेत. बांधकाम व्यवसायातील कामगारांना राज्य सरकारने जशी प्रत्येकी पाच हजारांची मदत केली तशीच मदत आम्हालाही करा, अशीही डबेवाल्यांची मागणी आहे.