नागपूर – शिवसेना आमदार अपात्रतेच्या ( thackeray group mla ) याचिकेवर आजपासून अंतिम सुनावणीला सुरुवात झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर ( Rahul narvekar ) यांच्यासमोर पुढील तीन दिवस युक्तीवाद होणार आहे. दोन्ही बाजूने अनेक दिग्गज वकीलांची फौज बाजू मांडत आहे. त्यामुळे कायद्याचे अनेक कंगोरे यातून तपासले जातील यात शंका नाही. आज ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत ( Devdutt kamat ) यांनी शेड्यूल 10 च्या मुद्द्यावरुनही भूमिका मांडली.
देवदत्त कामत म्हणाले, पक्ष आमचा हे मैदानावरच्या घोषणांनी ठरत नाही तर पक्ष घटनेनुसार प्रतिनिधी सभा, राष्ट्रीय कार्यकारिणीत ठराव करावा लागतो. पक्ष नेतृत्वातील बदल याच ठरावाने करता येतात. फुटून गेलेले विधिमंडळ सदस्य सांगतात की, आम्ही पक्षाचे सदस्यत्व सोडलेले नाही. परंतु त्यांच्या सर्व कृती पक्षाविरुद्ध असल्याने त्यांनी पक्ष सोडल्याचे स्पष्ट दिसते.
यावेळी देवदत्त कामत यांनी आज आपली बाजू मांडताना शेड्यूल 10च्या मुद्द्यावर बोट ठवले. बहुमताच्या आधारावर पक्ष आमचाच हा दावा शिंदे गटाला करता येणार नाही. कारण, 2003 साली संसदेने दहाव्या परिशिष्टात केलेल्या सुधारणेमुळे बहुमताच्या दावा करत शिंदे गटाला बचाव करता येणार नाही, असा युक्तीवाद कामत यांनी केला.
शिंदे – ठाकरे या दोन्हही गटाच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला. अधिवेशनामध्ये देखील सुनावणी सुरु असल्यामुळे या प्रकरणाचा निकाल ठरलेल्या वेळेत लागणार का ? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.