प्रभाकर बांगर यांचा इशारा
मंचर- शेतकऱ्यांबरोबर खासगी व सहकारी संघांनी मंगळवारी (दि. 21) एक दिवसासाठी दूध संकलन बंद ठेवावे, अन्यथा पुढील आंदोलन हे दूध संघांच्या विरोधात असेल. राज्य सरकार व केंद्र सरकारने याची दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुकाध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिला आहे.
करोनाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या संचारबंदीमुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे. तसेच इतर मागण्यांसाठी आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मंगळवारी (दि.21) पिंपळगाव येथे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी दिली. दुधाला प्रति लिटर पाच रुपये अनुदान द्यावे. केंद्र सरकारने दूध पावडरची खरेदी करून त्याचा बफर स्टॉक करून निर्यातीला किलोला 50 रुपये अनुदान द्यावे. दूध पावडर, बटर यावरील जीएसटी रद्द करावा, या मागण्यांसाठी मंगळवारी राज्यव्यापी दूध बंद आंदोलन करण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेने घेतला आहे.