लंडन – माणसाची उंची वाढण्याची प्रक्रिया आणि मेंदू याचा थेट संबंध असल्याचा निष्कर्ष काही वैज्ञानिकांच्या संशोधन अहवालात समोर आला आहे. व्यक्तीची उंची झपाट्याने का वाढते किंवा ती व्यक्ती लवकर का तरुण होते या प्रश्नाचे उत्तर शोधण्यात वैज्ञानिकांना यश मिळाले आहे.
मानवी मेंदूत अस्तित्वात असलेल्या एका खास अशा रिसेप्टरमुळे ही उंची वाढण्याची किंवा लवकर वयात येण्याची प्रक्रिया होते. हा रिसेप्टर मानवी शरीरातील हार्मोन्सचे संतुलन राखण्याचे आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याचे काम करत असतो.
केंब्रिज विद्यापीठ, क्रिस्टल विद्यापीठ, क्वीनमेरी विद्यापीठ, वंडरबोल्ट विद्यापीठ या विद्यापीठांतील संशोधकांनी याबाबत संशोधन पूर्ण केले आहे. मेंदूच्या हायपथमॅलिक न्यूरॉन्स या भागांमध्ये हा रिसेप्टर आढळतो हा रिसेप्टर मानवाची उंची लैंगिक भावभावना यांचे नियंत्रण करत असतो. हा रिसेप्टर व्यवस्थित काम करत नसेल तर माणसाची उंची व्यवस्थित वाढत नाही आणि तो बुटका राहू शकतो.
ही माणसे वयातही लवकर येत नाहीत संशोधकंच्या या टीमने पाच लाख लोकांचा अभ्यास केल्यानंतर हा निष्कर्ष समोर आला आहे. या पाच लाखांमध्ये 818 महिला होत्या. या संशोधनाचा मानवी आरोग्यासाठी खूप फायदा होणार आहे. कारण मेंदूमधील या खास रिसेप्टरचे आरोग्य चांगले ठेवले तर माणसाची उंची आणि इतर गोष्टी व्यवस्थित राहू शकणार आहेत.
त्यासाठी लागणारी औषधे आणि इतर उपचारांचा शोध आता नजीकच्या काळात लागण्याची शक्यता आहे. या संशोधनात दिलेल्या माहितीप्रमाणे अमेरिका आणि इंग्लंडमध्ये पुरुषांची सरासरी उंची पाच फूट नऊ इंच असून महिलांची सरासरी उंची पाच फूट तीन इंच आहे.