वॉशिंग्टन- इस्लामिक स्टेट या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेचा नेता ओसामा अल मोहाजेर हा पूर्व सीरियामध्ये अमेरिकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात मारला गेला आहे. अमेरिकेने याबाबतचा दावा केला आहे. शुक्रवारी हा ड्रोन हल्ला करण्यात आला होता, असे रविवारी प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात अमेरिकेच्या सेंट्रल कमांडचे प्रमुख मायकेल कुरिला यांनी म्हटले आहे. या हल्ल्यामध्ये कोणीही सामान्य नागरिक ठार झाले नाही, अथवा जखमी देखील झालेले नाही, असेही कुरिला यांनी म्हटले आहे.
ज्या ड्रोनच्या आधारे हा हल्ला करण्यात आला, त्या ड्रोनना रशियाच्या लढाऊ विमानांनी आदल्याच दिवशी पाडण्याचा प्रयत्न केला होता. रशियाची लढाऊ विमाने आणि अमेरिकेची ड्रोन यांच्यात जवळपास 2 तास हवाई चकमक सुरू राहिली होती, असे अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने म्हटले आहे. अमेरिकेकडून सीरियामध्ये इसिसविरोधात करण्यात येणाऱ्या ड्रोन कारवाईमध्ये रशियाच्या विमानांनी 24 तासांमध्ये दुसऱ्यांदा अडथळे आणले होते.
सीरियाच्या इडलिब भागामध्ये अजूनही इसिसचे प्राबल्य आहे. याविरोधात अमेरिकेच्या नेतृत्वाखाली अधूनमधून कारवाई केली जात असते. मात्र सीरियाचे अध्यक्ष बशर अल असाद यांचे पाठराखण करणाऱ्या रशियाकडून या कारवाईमध्ये नेहमीच अडथळे आणले जात असतात.