वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – मी कधीही दमदाटी केलेली नाही. शरद पवार साहेबांना चुकीची माहिती दिल्याने त्यांनी आपल्याबाबत वक्तव्य केले, असा दावा मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केला आहे.
लोणावळा येथील मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दमदाटी करू नका, अन्यथा गाठ माझयाशी आहे, असा इशारा आमदार सुनील शेळके यांना दिला. याबाबत शेळके यांना विचारले असता ते म्हणाले की, मी कधीही कोणाला दमदाटी केली नाही. पवार यांच्या उपस्थितीत ३०० कार्यकर्ते प्रवेश करणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
मात्र प्रत्यक्षात ३०–३५ जणांनी प्रवेश केला. स्थानिक नेत्यांनी हे अपयश लपविण्यासाठी कार्यकर्त्यांना आमदार सुनील शेळके यांनी दमदाटी केल्याचे खोटे सांगितले. त्यावरून पवार साहेबांनी आपल्याबाबत वक्तव्य केले. पवार साहेब कालही आमच्यासाठी श्रध्देय होते आणि यापुढेही राहतील.
शेळके पुढे म्हणाले की, येत्या आठ दिवसांत ज्यांनी चुकीची माहिती पवार साहेबांना दिली त्यांनी स्वतःहून त्यांना सांगावे, अन्यथा मी स्वतः भेट घेऊन सांगणार आहे. ज्यांना दमदाटी केली, असा एकतरी कार्यकर्ता दाखवा. मी चुकीचा असेल तर माफी मागेल. अन्यथा ज्यांनी चुकीची माहिती पवार साहेबांना दिली त्यांनी माफी मागावी, असेही आमदार शेळके म्हणाले.