वाल्हे, (वार्ताहर) – वाल्हे (ता.पुरंदर) येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ देवाच्या यात्रेची सुरुवात सोमवार (दि.29) झाली असून या निमित्ताने मानाच्या काठ्या व पालख्यांचे आगमन मंदिर परिसरात झाले.
वाल्हे येथील श्री संत सावता महाराज मंदिरापासून, भैरवनाथाच्या कावडीची वाजत गाजत कुंभारवाड्या जवळ आणण्यात आले. यावेळी, भैरवनाथांच्या मुखवटे पालखीत ठेवून, बाजार पेठेतून ढोलाच्या, ताशा, सनई चौघडे यांसह गुलालाची मुक्त उधळण करीत, भैरवनाथ मंदिरात आगमन करण्यात आले.
यावेळी, मंदिर प्रदिक्षणा मारून, आरती घेण्यात आली. यावेळी, भैरवनाथ यात्रा कमिटीचे सदस्य यांच्यासह सालकरी, मानकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरम्यान, यात्रेनिमित्त मंदिर परिसरात सुशोभिकरण करण्यात आले असून मंदिर व परिसराला केलेल्या विद्युत रोषणाईने मंदिर व परिसर उजळून निघालेले आहे.
दरम्यान, सोमवारी यात्रेस पारंभ झाला असून यात्रा पाच दिवसाची असून आज देव देवळात गेले आहेत; तर मंगळवारी (दि. 30) श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा हळदीचा कार्यक्रम होणार आहे; अशी माहिती श्री भैरवनाथ मंदिराचे पुजारी सचिन आगलावे यांनी दिली.