मुंबई – गेल्या अनेक महिन्यांपासून राज्यामध्ये सत्तासंघर्ष सुरु होता. अशातच आज सुप्रीम कोर्टाने याबाबतचा महत्वपूर्ण निकाल जाहीर केला आहे. पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठाने राज्यातील सत्तासंघर्षांवर निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाच्या याच निकालावर अनेक नेत्यांच्या प्रतिक्रिया येत असून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील फेसबुकवर पोस्ट लिहीत आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
काय आहे अंधारेंची पोस्ट?
सुषमा अंधारे यांनी एकापाठोपाठ दोन फेसबुक पोस्ट शेअर केल्या आहेत, त्यातील पहिल्या पोस्टमध्ये “ऑपरेशन इज सक्सेस बट पेशंट इज डेड’ म्हणजेच ‘जी काही शस्रक्रिया होती, ती यशस्वी झाली, मात्र रुग्णाचा मृत्यू झाला आहे.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे. तर दुसऱ्या पोस्टमध्ये म्हटले आहे कि ‘सन्मानाने पक्षप्रमुखांनी जो राजीनामा दिला तो इथल्या राजकीय संस्कृतीला साजेसा निर्णय होता.
जुडीशियल इथिक्सचा भाग म्हणून सुद्धा ते अतिशय योग्य होतं. न्यायालयाची टिप्पणी काहीही असेल तरी आपल्या आतला आवाज, आपला विवेक जागृत ठेवून पक्षप्रमुखांनी जो निर्णय घेतला होता, तो कालही योग्यच होता आणि आज सन्माननीय न्यायालयाने टिप्पणी केल्यानंतर सुद्धा आम्हा सगळ्यांना योग्यच वाटतो.’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.