वाघोली -जिल्ह्यातील धार्मिक स्थळे तथा मंदिरे खुली करण्याची मागणी पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष किरण दगडे पाटील, संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी केली आहे.
जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने हॉटेल, बियर बार, तसेच मॉल, दुकाने, क्रीडांगणे यांना निश्चित वेळा करून सोशल डिस्टंन्सिंगचा आधार देत सवलती देण्यात आल्या आहेत.
त्याचप्रमाणे श्रावण महिन्यामध्ये जिल्ह्यातील धार्मिकस्थळे व मंदिरे तातडीने खुली करून नागरिकांना दर्शनाचा लाभ मिळवून देण्याकरिता जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाध्यक्ष किरण दगडे पाटील यांनी केली आहे.
स्थानिक पातळीवरील देवस्थान ट्रस्ट व प्रशासकीय मंदिर समिती यांनी करोनाबाबत नागरिकांना प्रबोधन करून रांगेत दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना राबवून सहकार्य करण्याची मागणीदेखील दगडे पाटील यांनी केली आहे.
धार्मिक स्थळे तथा मंदिराच्या भोवती अनेक हातावर पोट असणाऱ्या लहान मोठ्या व्यवसायिकांना मंदिरे खुली केल्याने कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावता येऊ शकतो.
सध्या ही कुटुंबे उपासमारीच्या कक्षेत आहेत. शासनाने मंदिरे खुली करून मंदिराच्या भोवती असणाऱ्या रोजगाराच्या नव्या वाटा खुल्या करण्यासाठी तातडीने मदत करावी.
– संदीप सातव, संघटन सरचिटणीस, जिल्हा युवा मोर्चा.