नगर – महापालिकेने मालमत्ताधारकांना सवलत देऊनही फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल महिन्यात कर भरणाऱ्यांना दहा टक्के सवलत दिली असतांना केवळ 10 कोटी 26 लाख रुपयेच महापालिकेच्या तिजोरीत जमा झाले आहे. यात आणखी भर पडेल, या अपेक्षेने महापालिका आयुक्तांनी 31 मेपर्यंत 10 टक्के सवलतीचा कालावधी वाढवून दिला आहे.
मागील आर्थिक वर्षात महापालिकेने विक्रमी 70 कोटी 15 लाख रुपये कर वसूल केला. आता सन 2023-2024 या आर्थिक वर्षाचा कराचा भरणा सुरू झाला आहे. एप्रिल महिन्यात 16 हजार 623 मालमत्ताधारकांनी सर्वसाधारण करावर 10 टक्क्यांची सूट घेत 10 कोटी 26 लाख रुपये कर जमा केला आहे. या मालमत्ता धारकांना 43.35 लाख रुपयांची सवलत देण्यात आली आहे. सन 2023-24 या आर्थिक वर्षात महापालिकेची मालमत्ता कर व पाणीपट्टीची सुमारे 230 कोटी रुपये थकबाकी आहे. एवढी रक्कम वसुलीचे महापालिकेसमोर आव्हान आहे. एप्रिल महिन्यात सर्वसाधारण करावर 10 टक्के सवलत असते. तर मे व जून महिन्यात 8 टक्के सवलत असते.
नियमित कर भरणारे हजारो मालमत्ताधारक दरवर्षी या सवलतीचा लाभ घेऊन कर जमा करतात. एप्रिल महिन्यात 16 हजार 623 मालमत्ताधारकांनी 43 लाख 35 हजार 484 रुपयांची सवलत घेत 10 कोटी 26 लाख 99 हजार 484 रुपयांचा कर जमा केला आहे.
दरम्यान, मध्यतंरी महापालिका आयुक्तांनी शास्त्री माफ योजना देखील जाहीर केली होती. परंतु या योजनेला देखील फारसा प्रतिसाद मिळाला नाही.महिनाभरासाठी ही योजना असतांना केवळ 18 कोटी रुपये जमा झाले होते. लोकअदालतमध्ये मोठ्या संख्येने प्रकरणे ठेवण्यात आली होती. पण त्यातून महापालिकेला केवळ 1 कोटी 25 लाख रुपये जमा झाले.
अनेक सवलती देऊनही मालमत्ताधारकांकडून त्याला प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. नागरिकांना कर भरण्यास आकर्षित करण्यासाठी महापालिकेने यंदा सर्वसाधारण करावरील 10 टक्क्यांची सवलत 31 मेपर्यंत वाढवून दिली आहे. या सवलतीचा नागरिकांनी फायदा घ्यावा व कराचा भरणा करून शास्तीची आकारणी टाळावी, असे आवाहन आयुक्त पंकज जावळे यांनी केले आहे.