नवी दिल्ली : देशांत प्रती लाख केवळ 7.9 लोकांना करोनाची बाधा झाली आहे. देशात सध्या सक्रिय बाधितांची संख्या 61 हजार 149 आहे. तर बरे झालेल्यांची संख्या 42 हजार 298 आहे. अशी एकूण बाधितांची संख्या एक लाख सहा हजार 750 झाली आहे, अशी माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने दिली.
सक्रीय बाधीत असणाऱ्यांपैकी 6.39 टक्के जणांना वैद्यकीय मदतीची गरज भासली आहे. तर 2.94 टक्के जणांना ऑक्सिजन लावावा लागला आहे. तर केवळ 0.45 टक्के जणांना व्हेंटीलेटर्सची गरज भासली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी दैनंदिन वार्तालापात दिली.
देशात बरे होणाऱ्यांचा दर 39.62 टक्के आहे. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या काळात तो 7.1 टक्के होता, अशी माहिती त्यांनी दिली. हायड्रोक्सीक्लोरोक्विन गोळ्यांचा वापर उपचारातून थांबवण्याबाबतचा निर्णय त्याच्या परिणामकारकतेचा अभ्यास केल्यानंतर घेण्यात येईल, असे आयसीएमआरने स्पष्ट केले.