women police force – महिला पोलिसांची संख्या ३३ टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे. मात्र, सध्या देशातील पोलीस दलांत महिलांचे प्रमाण केवळ ११.७५ टक्के आहे, अशी माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत दिली.
महिला पोलिसांची संख्या वाढवण्यासंदर्भात केंद्रीय गृह मंत्रालयाने सर्व राज्य सरकारांना आणि केंद्रशासित प्रदेशांच्या प्रशासनांना मे २०१४ पासून विविध सूचना जारी केल्या.
कॉन्स्टेबल आणि उप-निरीक्षकांची रिक्त पदे महिलांसाठीच्या अतिरिक्त पदांमध्ये रूपांतरित करण्यासही सांगण्यात आले. प्रत्येक पोलीस ठाण्यात ३ महिला उप-निरीक्षक आणि १० महिला कॉन्स्टेबल असाव्यात असे सरकारचे उद्दिष्ट आहे.
देशात २०२० या वर्षात १०.३० टक्के महिला पोलीस होत्या. ते प्रमाण पुढील वर्षी १०.४९ टक्के इतके झाले. आता त्यामध्ये आणखी वाढ झाली आहे.
अधिकाधिक महिलांनी पोलीस दलांमध्ये भरती व्हावे या उद्देशातून त्यांच्यासाठी कल्याणकारी उपाययोजना राबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही राय यांनी नमूद केले.