हाथरस – महिलांवरील लंगिक अत्याचाराचे केंद्र बनलेल्या उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. याधीच्या एका घटनेत दलित युवतीवरील बलात्कार आणि नंतर रुग्णालयात झालेला तिचा मृत्यु या घटनेने संपूर्ण देश ढवळून निघालेला असताना आता एका चार वर्षांच्या मुलीवर दोन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दोन्ही मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून पिडीत बालिकेला रुग्णालयात दाखल केले आहे.
हाथरसमधील ही घटना गुरुवारी घडली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. याप्रकरणी ताब्यात घेण्यात आलेल्या मुलांचे वय 9 व 12 वर्ष असल्याचे समजते. पीडित मुलीच्या वडिलांनी याबद्दल पोलिसांना माहिती दिल्यानंतर स्थानिक हाथरस पोलिसात बलात्काराची घटना घडल्याची प्राथमिक नोंद केली गेली. पोलिसांनी या प्रकरणी ताब्यात घेतलेले दोन्ही मुलं एकाच गावातील आहेत. पीडित मुलीस वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.