कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील खिंडी व्हरवडे (ता. राधानगरी) येथे गॅस सिलिंडरचा (कार्बाइड) स्फोट होवून एका युवकाचा मृत्यू झाला आहे. सागर दिलीप करपे (वय 17) असे मृत्याचे नाव आहे. तर बाजीराव करपे, दिलीप करपे हे दोघे जखमी झाले आहेत.
खिंडी व्हरवडे येथील शिवशंभो वेल्डिंग वर्क्समध्ये झालेल्या गॅस सिलिंडर स्फोटात सागर करपे (वय 17, रा. चक्रेश्वरवाडी) या युवकाचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचे वडील दिलीप करपे व चुलते बाजीराव करपे हे किरकोळ जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चक्रेश्वरवाडी येथील दिलीप करपे व बाजीराव करपे यांचे राधानगरी कोल्हापूर राज्यमार्गावरील खिंडी व्हरवडे शिवशंभो वेल्डिंग वर्कशॉप आहे. सकाळी साडेअकराच्या सुमारास सागर करपे जेवणाचा डबा देण्यासाठी वर्कशॉपमध्ये गेला होता.
त्याचे वडील व चुलते गॅसचे काम करत होते. त्यावेळी कार्बाइड सिलिंडरचा अचानक स्फोट होऊन त्यामध्ये सागर जागीच ठार झाला. तर वडील दिलीप करपे व चुलते बाजीराव करपे जखमी झाले आहेत. घटनेची नोंद राधानगरी पोलिसांत केली असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक उदय डूबल करत आहेत.