मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा एकदा शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यासह त्यांच्या मित्रपरिवारावर गंभीर आरोप केले आहेत. संजय राऊत मित्र परिवाराने १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला असल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्याने पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यावर आता खासदार संजय राऊत यांनी अगदी खोचक शब्दात प्रतिउत्तर दिले आहे. शेणं खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा असं म्हणत राऊतांनी सोमय्यांच्या आरोपांवर उत्तर दिले आहे. “माणसाने एकदा शेण खायचं ठरवलं तर शेणं खायचं स्वत: आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायचा. गुन्हे किती हवे ते केंद्र सरकारकडून ईडीकडून दाखल करु द्या. ईडीचे लोकं येतात आमच्या लोकांना पकडतात. आमच्याविरोधात खोटे स्टेटमेंट घेत आहेत. मला माहित आहे सर्व… दबाव टाकू, जेलमध्ये टाकू… अनिल परबांविरोधात हे स्टेटमेंट द्या, संजय राऊतांविरोधात हे स्टेटमेंड द्या….. हे चालू आहे त्यांचे” असा आरोपही राऊत यांनी केला आहे.
दरम्यान, संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागीदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचे कंत्राट मिळवले. असा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. दहिसर, वरळी, महालक्ष्मी रेसकोर्स आणि मुलंड येथील कोविड सेंटर्सचं कंत्राट संजय राऊत यांचे भागीदार असलेले सुजीत पाटकर यांनी मिळवलं असल्याचं सोमय्या यांनी म्हटलं आहे. तसेच, या प्रकरणी चौकशी करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे.
“संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर यांनी आता १०० कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केला आहे. मुंबईत लाईफलाइन हेल्थ केअर जी कंपनी अस्तित्वात नाही, पेपर कंपनी. त्याला महालक्ष्मी रेसकोर्स, वरळी NSCI, मुलुंड, दहिसर आणि पुणे येथील कोविड सेंटर्सचे कंत्राट ठाकरे सरकारने दिले. या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात ८० कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केलं, २० कोटींचं दुसरे करत आहे. या संदर्भात नॅशनल डिझायस्टर मॅनेजमेंट ऑथरिटीचे चेअरमन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मी तक्रार केलेली आहे. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी.” असे भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी सांगितले आहे.
याचबरोबर, “आज दुपारी ४ वाजता मी पुण्यातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्यासाठी संजय राऊत यांचे भागीदार सुजीत पाटकर लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस विरुद्ध शिवाजी नगर पुणे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करेन, ज्यामुळे कोविड रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.” अशी माहिती देखील किरीट सोमय्या यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.