Lok Sabha Election 2024| गुजरातच्या मतदार संघात लोकसभा निवडणुकीपूर्वीच भाजपने खाते उघडले आहे. कॉंग्रेसचे येथील उमेदवार निलेश कुंभानी यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला. त्यानंतर या मतदारसंघातून रिंगणात असलेल्या अन्य सर्व उमेदवारांनीही माघार घेतली. त्यामुळे भारतीय जनता पार्टीचे मुकेश दलाल येथून बिनविरोध विजयी झाले आहेत.
ही सगळी घटना सोमवारी घडली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयामुळे चर्चेत आलेले काँग्रेसचे उमेदवार निलेश कुंभाणी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
या आठवड्यात ते भाजपामध्ये प्रवेश करणार असल्याचे म्हंटले जात आहे. तर दुसरीकडे, सुरत लोकसभा जागेवर भाजपाचे उमेदवार मुकेश दलाल यांच्या बिनविरोध विजयानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे. मुकेश दलाल यांना अनावश्यक प्रभावातून विजयी घोषित केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या जागेवर नव्याने निवडणुका घ्याव्यात, अशी काँग्रेसची मागणी आहे.
मुकेश दलाल कसे झाले विजयी ?
सुरत लोकसभा मतदारसंघातून एकूण 9 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. नुकताच येथून काँग्रेसचे उमेदवार नीलेश कुंभानी यांचा अर्ज रद्द करण्यात आला. यानंतर एकामागून एक सहा उमेदवारांनी या जागेवरून आपले अर्ज मागे घेतले. फक्त बसपचे उमेदवार प्यारेलाल अर्ज मागे घेण्याचे राहिले होते. त्यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. आज सकाळी प्यारेलाल सुरत जिल्हा प्रशासन कार्यालयात पोहोचले आणि त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यानंतर भाजपचे उमेदवार मुकेश दलाल यांनी येथून बिनविरोध निवडणूक जिंकली आहे. दरम्यान, गुजरातमधील सर्व २६ जागांसाठी तिसऱ्या टप्प्यात ७ मे रोजी मतदान होणार आहे.