पुणे – मुलगा-मुलगी भेदभाव न ठेवता मुलीही मुलांपेक्षा कमी नाहीत, याबाबत जनजागृती तसेच स्त्री जन्माचे स्वागत होत असल्याने राज्यभरात मुलींचा जन्मदर सुधारला असला तरी, “सुशिक्षितांचे पुणे’ अशी बिरुदावली मिरवणाऱ्या पुण्यात मात्र, ती पुन्हा “नकोशी’ झाली आहे. महापालिका हद्दीतील मुलींचा जन्मदर लक्षणीय प्रमाणात घटला असून, 2023 मध्ये हा दर 1 हजार मुलांमागे 863 झाला आहे. विशेष बाब म्हणजे 2020 मध्ये हाच जन्मदर 1 हजार मुलांमागे 946 मुली असा होता.
करोनानंतरच्या काळात अचानक हा जन्मदर लक्षणीय घटल्याने राज्य शासनाने महापालिकेच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाकडील आकडेवारीतून ही बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे गेल्या काही वर्षांत राज्यात स्त्री-पुरूष जन्मदराच्या गुणोत्तरात पुणे महापालिका राज्यात सातत्याने अग्रभागी होती. त्यामुळे राज्याच्या आरोग्य विभागाकडून महापालिकेच्या कामकाजाचा गौरव करत, राज्यातील इतर शहरांनीही मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी महापालिकेच्या धर्तीवर उपाय योजना राबविण्याच्या सूचना केल्या आहेत.
मात्र, मागील दोन ते तीन वर्षांत महापालिकेकडून याबाबत करण्यात येत असलेली जनजागृती तसेच इतर उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात प्रशासन तसेच आरोग्य विभाग कमी पडल्याने शहरातील मुलींचा जन्मदर लक्षणीय घटला असून, महापालिका नेमकी कुठे कमी पडली, याबाबत शंका उपस्थित केल्या जाऊ लागल्या आहेत.
दहा वर्षांच्या कामावर पाणी
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 2010 साली पुणे शहरातील मुलींच्या जन्माचे प्रमाण 879 होते. तर 2011 मध्ये 884 एवढे होते. मात्र, या कालावधीत शहरात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर गर्भलिंग निदान केले जात असल्याचे तसेच अनधिकृत गर्भपातांचे प्रमाणही वाढले असल्याचे समोर आल्यानंतर, महापालिकेकडून शहरात गर्भलिंगनिदान कायद्याची कडक अंमलबजावणी सुरू केली. त्याचे परिणाम चांगले दिसले.