पुणे- शिवसेनेने केलेल्या धक्काबुक्कीला उत्तर देण्यासाठी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा सत्ताधारी भाजपने महापालिकेत जोरदार शक्तिप्रदर्शन करत सत्कार केला. यावेळी जमलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी अतिउत्साह दाखविल्याने सोमय्यांनाच आत घेऊन जाताना पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. त्यानंतर पालिका आयुक्तांची भेट घेत सोमय्या यांनी निवेदन दिले.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या भ्रष्टाचारावरून थेट मुख्यमंत्र्यावर आरोप केले आहेत. या कोविड सेंटरमध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा दावा त्यांनी केला आहे. मात्र, उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये कोणताही भ्रष्टाचार झाला नसल्याचे स्पष्ट केले आहे.
आज पुण्यातील पत्रकार परिषदेत अजित पवार म्हणाले,’ पुण्यातील करोनाच्या वाढत्या पुण्यात जेव्हा करोनाचे सावट होते त्यावेळी कामे अतिशय पारदर्शक पद्धतीने झाली. आपण जी कामे केली आहेत त्यामध्ये राज्यसरकार, जिल्हा वार्षिक योजना, पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगर पालिकेचा हिस्सा आहे. जम्बो कोविड सेंटर उभे करताना कोणत्याही पक्षाच्या राजकीय पदाधिकाऱ्याला सामील करण्यात आले नाही. अशी स्पष्ट भूमिका पवार यांनी मांडली आहे.