मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी आणि सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांच्याबद्दल ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपचा पदाधिकारी जितेन गजारीयावर मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने कारवाई करत ताब्यात घेतले. जितेन गजारीयाने रश्मी ठाकरे यांच्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलही ट्विटरवर आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.
जितेन गजारिया हे भाजपचे सोशल मीडिया प्रभारी आहेत. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या विरोधात ट्विट करताना आक्षेपार्ह भाषेचा उपयोग केला होता. आक्षेपार्ह ट्विट केल्याप्रकरणी जितेन गजारियाला मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने नोटीस बजावली होती.
त्यानंतर जितेन गजारिया यांना चौकशीसाठी मुंबई पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. हे आक्षेपार्ह ट्विट त्यांनी का केले आणि त्यामागे त्यांचा काय उद्देश होता याबाबत आता पोलीस त्यांची चौकशी करत आहेत.
दरम्यान, भाजपच्या सोशल मीडिया प्रभारींनी अशाप्रकारे आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. भाजपला राज्यात सत्ता मिळत नसल्याने त्यांच्याकडून अशा प्रकारचे कृत्य सुरू असल्याची प्रतिक्रिया महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून येत आहे.