सातारा – येथील जनता सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत अखेरच्या दिवशी आणखी तीन जागा बिनविरोध झाल्या. तर आता सर्वसाधारणमधील 16 आणि ओबीसी प्रवर्गातील एका अशा एकण 17 जागांसाठी निवडणूक होणार असून 19 जण रिंगणात आहेत.
जनता बॅंकेच्या भागधारक पॅनेलचे प्रमुख विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली एकूण चारजण बिनविरोध झाले आहेत. उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी शकील बागवान, चारुदत्त सपकाळ या दोघांचेही अर्ज कायम राहिल्याने निवडणूक होणार हे निश्चित झाले. आता सोमवारी चिन्हांचे वाटप होईल. तर 17 जूनला मतदान होऊन 18 रोजी निकाल जाहीर होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अनुराधा पंडितराव यांनी दिली.
जनता बॅंकेच्या या निवडणुकीत सर्वसाधारणमधून 16 जणांना, महिला प्रवर्गातून दोन, अनुसूचित जाती-जमाती गटातून एक, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास गटातून एक आणि ओबीसी गटातूनही एका संचालकाला निवडून द्यायचे आहे. यामधील विशेष मागास गटात एकच अर्ज राहिला होता. त्यामुळे बाळासाहेब गोसावी यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर मागील 12 दिवस उमेदवारी अर्ज माघार घेण्याची प्रक्रिया सुरू होती. शुक्रवार हा उमेदवारी अर्ज माघारीचा अंतिम दिवस होता. त्यात काहींनी माघार घेतली. त्यामुळे महिलांमधील दोन जागा बिनविरोध झाल्या आहेत. यामध्ये सुजाता राजेमहाडिक आणि चेतना माजगावकर यांचा समावेश आहे.
तर अनुसूचित जाती-जमाती गटातूनही प्रकाश बडेकर यांनी माघार घेतल्याने विजय बडेकर यांची निवड बिनविरोध झाली. आता 17 जागांसाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये सर्वसाधारणमधील 16 जागा आहेत. यासाठी 17 जणांत लढत आहे. आनंदराव कणसे, विनोद कुलकर्णी, अक्षय गवळी, चंद्रशेखर घोडके, जयेंद्र चव्हाण, मच्छिंद्र जगदाळे, वजीर नदाफ, शकील बागवान, अविनाश बाचल, चंद्रकांत बेबले, जयवंत भोसले, रवींद्र माने, अमोल मोहिते, वसंत लेवे, नारायण लोहार, रामचंद्र साठे आणि माधव सारडा हे रिंगणात आहेत. ओबीसी प्रवर्गात चारुदत्त सपकाळ आणि अशोक मोने यांच्यातच लढत होणार आहे.