पाचगणी – खिंगर (ता. महाबळेश्वर) येथे विठ्ठल राऊ दुधाणे यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे शुक्रवारी पहाटे आग लागली. यामध्ये संसारोपयोगी साहित्य, गुरांचा चारा, शेतीची औजारे, इंजिन जळून बारा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेमुळे दुधाणे यांचे कुटुंबीय उघड्यावर पडले आहे.
खिंगर येथील विठ्ठल दुधाणे यांच्या घराला पहाटे 4 च्या सुमारास अचानक आग लागली. घर जुने असल्याने आणि आत गुरांचा चारा असल्याने या आगीने लगेच रौद्ररूप धारण केले. यावेळी दुधाणे कुटुंबीय झोपले होते. आग लागल्याचे समजताच ग्रामस्थांनी जीवाची पर्वा न करता सर्वप्रथम घरातील लोक, सात गुरे आणि दहा शेळ्यांना सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. ग्रामस्थांनी परिश्रमाने आग आटोक्यात आणली; परंतु तोपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले. दुधाणे यांचे संसारोपयोगी साहित्य, गुरांचा चारा, शेतीची औजारे, मोटार, पंप, शिलाई मशीन आगीच्या भक्ष्स्थानी पडले.
जिल्हा बॅंकेचे संचालक राजेंद्र राजपुरे हे स्वतः हजर होते. तलाठी नीलेश गीते, ग्रामसेवक सपना जाधव, सरपंच दिनकर मोरे, पोलीस पाटील राजू दुधाणे, सहकार बोर्डाचे संचालक महादेव दुधाणे यांनी घटनास्थळी भेट दिली. तलाठी गीते यांनी पंचनामा केला असून, दुधाणे कुटुंबीयांचे सुमारे 12 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी केली.