नवी दिल्ली – करोना संकटाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला होता. या बैठकीला बहुतांश मुख्यमंत्री उपस्थित होते. हा संवाद एकतर्फी झाल्याची टीका मोदींवर झाली असली तरी आता सोशल मीडियावर आणखी एक क्लिप फिरते आहे. त्यात बैठकीच्या वेळी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ज्या प्रकारे बसले होते, त्याला आक्षेप घेण्यात आला आहे.
पंतप्रधानांनी भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांना इंधनावरील करावरून आवाहन केले होते. मात्र त्यांची ही सूचना राजकीय स्वरूपाची जुमलेबाजी होती अशी टीका झाली. तथापी, राज्यांची थेट नावे घेत या राज्यांनी जनतेला दिलासा देण्यासाठी प्रयत्न करावे असे त्यांनी सूचित केले. या बैठकीदरम्यान पंतप्रधान मोदी विनंती करत असताना अरविंद केजरीवाल खुर्चिवर मागे रेलून बसले होते. ते फुटेज समोर करत आता त्यांना लक्ष्य केले जात आहे.
भारतीय जनता पक्षाने बुधवारी दुपारी एका ट्विटमध्ये दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर निराचार असल्याबद्दल निंदा केली. केजरीवाल आणि भाजप यांचे सख्य जगजाहीर आहे. आता दिल्ली महापालिकांच्या निवडणुकांच्या मुद्द्यावरून त्यांच्यात संघर्ष सुरू आहे. असे असताना हे फोटो मिळाल्यामुळे भाजपची सोशल मीडिया टीम केजरीवाल यांच्यावर तुटून पडली आहे.