पाथर्डी, {प्रतिनिधी} – सध्याच्या लोकसभा निवडणुकीत मराठा विरुद्ध ओबीसी अशा पद्धतीची जातीयवादाची किनार निर्माण झाली आहे. ज्या मतदारसंघात ओबीसी उमेदवार उभे आहेत, त्यांना मराठा समाजाकडून तीव्र विरोध होत असल्याने या निवडणुकीत ओबीसी बहुजन पक्ष अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघातून आपला ओबीसी चेहरा असलेला उमेदवार देणार असल्याची माहिती ओबीसी नेते दिलीप खेडकर यांनी दिली. दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पक्षाने उमेदवारी दिल्यास आपण लोकसभा निवडणूक लढवू, असेही खेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
पाथर्डी येथील खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी ओबीसी बहुजन पक्षाची स्थापना झाली असून प्रकाश शेंडगे यांच्यासह अन्य ओबीसी नेत्यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यात ओबीसी चेहरे असलेले उमेदवार लोकसभेच्या निवडणुकीच्या रिंगणात उभे केले जाणार असल्याचे स्पष्ट केले. दिलीप खेडकर यांच्या समवेत भालगावच्या माजी सरपंच मनोरमा खेडकर उपस्थित होत्या.
खेडकर म्हणाले, काही महिन्यापूर्वीपासून ओबीसी आणि मराठा आरक्षण हा वाद सुरू झालेला आहे, तो अजूनही संपलेला दिसत नाही. आज ही ठिकठिकाणी ओबीसीचे लोकसभेचे उमेदवार आहेत, त्यांना मराठा समाजाकडून तीव्र स्वरूपाचा विरोध होताना दिसतोय. या अशा घटनांमुळे ओबीसी समाजाकडून तीव्र प्रतिक्रिया येत आहे.
ज्या ठिकाणी ओबीसीचे उमेदवार उभे आहे, तेथं असलेला मराठा उमेदवार त्याला मराठ्यांनी मतदान करायचं असे चित्र निर्माण झालेले आहे. तीच पुनरावृत्ती ओबीसी समाजाकडून होत असून ओबीसी समाजाने ओबीसी उमेदवारालाच मतदान करायचं अशा प्रकारच्या भावना लोकांच्या मनामध्ये आहे. म्हणून या गोष्टीचा विचार करून ओबीसी बहुजन पार्टीने ओबीसीचा उमेदवार लोकसभेसाठी अहमदनगर दक्षिणमधून देण्याचा ठरवलेलं आहे.
आरक्षणाच्या मुद्द्यावरून आपला राग व्यक्त करण्यासाठी ओबीसीचा एकही उमेदवार समोर उभा नाही, अशा प्रकारची ओबीसी लोकांमधून प्रतिक्रिया ऐकायला येत होत्या. त्याची चाचणी करून आता लवकरच ओबीसीचा दक्षिण लोकसभेसाठी उमेदवार जाहीर होणार आहे. माझा तसा लोकसभा निवडणूक लढवण्याचा कधीच विचार नव्हता. पक्षाला वाटलं की, बाकीच्या सर्व उमेदवारापेक्षा मी सक्षम आहे. तर पक्षाने मला उमेदवारी लढवण्याचा आदेश दिल्यास मी निश्चितच लोकसभा लढवेल, असेही खेडकर म्हणाले.