पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे “आरोग्य गणेशा’ जय गणेश रुग्णसेवा अभियान राबवले जात आहे. त्या अंतर्गत तब्बल ४१ हजार ८७७ रुग्णांना मदत करण्यात आली आहे, अशी माहिती ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी आणि सरचिटणीस हेमंत रासने यांनी बुधवारी दिली.
यावेळी ट्रस्टचे उपाध्यक्ष सुनील रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, उपाध्यक्ष सौरभ रायकर, तुषार रायकर, मंगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
सन २०२३-२४ या वर्षात विविध १०,९८८ शस्त्रक्रिया, सुमारे २,४६७ रुग्णांच्या तपासण्या, ८९८ जणांना श्रवणयंत्र वाटप, २७,३९२ रुग्णांची मोफत नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि १३२ रुग्णांना कृत्रिम अवयव वाटप करण्यात आले. यामध्ये पुण्यातील १८५ विविध रुग्णालयांच्या सक्रीय सहभाग होता. वर्षभरात ट्रस्टशी संलग्न असलेल्या विविध १८५ रुग्णालयांमधून १० हजारांहून अधिक रुग्णांच्या शस्त्रक्रिया विनामूल्य करुन देण्यात आल्या.
त्यामध्ये विशेषत: ७१ लहान मुलांच्या ह्रदयाच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. तसेच हृदयविकार, कर्करोग, मोतीबिंदू काचबिंदू, पडद्याशी संलग्न शस्त्रक्रिया, लॅसिक तसेच खुबा प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण, किडनी स्टोन, प्रोस्टेट ग्रंथी वाढणे शस्त्रक्रिया, हर्निया, मूळव्याध, फिशर, पित्ताशय खडे काढणे, गर्भाशय पिशवी काढणे, लहान मुलांच्या तिरळेपणा शस्त्रक्रिया, फिजिओथेरपी, माफक दरात पेट सीटी स्कॅन, एमआरआय, सीटी स्कॅन, सोनोग्राफी इत्यादी वैद्यकीय सुविधा आणि ट्रस्टच्या केंद्राच्या माध्यमातून विविध रक्त तपासण्या मोफत आणि यशस्वीरित्या करुन देण्यात आल्या.
दरमहा विविध उपक्रम
याशिवाय प्रत्येक महिन्याला आरोग्य शिबिर, झोपडपट्टी भागात मोफत नेत्र तपासणी, पॅथॉलॉजिकल टेस्ट सेंटर अंतर्गत तीन महिन्यात १,९४१ रुग्णांच्या मोफत तपासण्या, श्रवणदोष असणाऱ्यांना श्रवणयंत्राचे वाटप, ११ विनामूल्य रुग्णवाहिका, ससूनमध्ये दररोज तीन हजार रुग्णांना मोफत भोजन, दरवर्षी गणेशोत्सव कार्यकाळात भाविकांसाठी मोफत वैद्यकिय मदत केंद्राची व्यवस्था आदी उपक्रमही करण्यात येतात, असे यावेळी सांगितले.
मदतीसाठी संपर्क – ०२०- २४४७-९२२२/ २४४३-०५२७