लाहोर – पाकिस्तान येथे शिक्षकांच्या पोशाखावरच अनेक अटी आणि निर्बंध लावण्यात आले आहे. पाकिस्तानमधील महिला शिक्षकांनी जीन्स आणि घट्ट कपडे घालू नये अशी अधिसूचना जारी केली आहे. हि अधिसूचना फेडरल डायरेक्टोरेट ऑफ एज्युकेशनने जाहीर केली असून अधिसूचनेत पुरुष शिक्षकांना देखील जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास मनाई करण्यात आली आहे.
याबाबतचे पत्र सोमवारी (६ सप्टेंबर) शिक्षण संचालकांकडून शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापकांना पाठविण्यात आलं आहे. या पत्रामध्ये प्रत्येक कर्मचारी आपल्या शारीरिक स्वरूप आणि वैयक्तिक स्वच्छतेसाठी योग्य ते उपाय करत असल्याची खात्री करावी.’ असं या पत्रात मुख्याध्यापकांना सांगण्यात आलं आहे.
या पत्रात असेही नमूद करण्यात आले आहे की, ‘नियमित केस-दाढी कापणे, नखं कापणे, डिओडोरंट किंवा परफ्यूम वापरणं असे काही उपाय देखील सुचवण्यात आले आहेत. पाकिस्तानमधील सर्व शिक्षकांना आता या सूचना आणि उपाययोजना त्यांच्या कार्यालयीन वेळेसह कॅम्पस आणि अधिकृत मेळावे तसेच बैठकांदरम्यान देखील पाळाव्या लागणार आहेत.’
असा असणार महिला शिक्षकांचा ड्रेसकोड
पत्रानुसार महिला शिक्षकांना जीन्स किंवा घट्ट कपडे घालण्याची परवानगी नाही. तर त्याऐवजी त्यांना साधे सलवार कमीज, ट्राउझर, दुपट्टा/शालसहित शर्ट घालण्यास सांगण्यात आलं आहे.
– पर्दा पाळणाऱ्या महिलांना स्वच्छ आणि व्यवस्थित दिसण्यासाठी स्कार्फ/हिजाब घालण्याची परवानगी असेल.
– हिवाळ्याच्या काळात, महिला शिक्षकांना साध्या रंग आणि डिझाईन्सचे कोट, ब्लेझर, स्वेटर, जर्सी आणि शाल वापरता येईल. याचसोबत, महिला शिक्षकांना एकतर फॉर्मल शूज (पंप, लोफर, म्यूल्स) किंवा स्नीकर्स आणि सँडल घालण्याची परवानगी असेल.
असा असणार पुरुष शिक्षकांसाठी ड्रेसकोड
– पुरुष शिक्षकांनी सलवार कमीजसह वेस्टकोट घालणं किंवा शर्ट-पँट आणि टाय असा पोशाख करणं अनिवार्य आहे. परंतु, जीन्स आणि टी-शर्ट घालण्यास मनाई असेल.