महाराष्ट्रात फक्‍त शरद पवारांची लाट

अतुल बेनके यांच्या प्रचार सांगता सभेत खासदार डॉ. कोल्हेंचे प्रतिपादन

नारायणगाव – महाराष्ट्रात कोणी कितीही थाट केला तरीही महाराष्ट्रात एकच लाट आणि विचार आहेत ते म्हणजे फक्‍त शरद पवार यांचे. साताऱ्याच्या सभेत 79 वर्षांचा तरुण भर पावसात जखम झालेल्या पायाला पट्टी बांधून गर्जत आहे, ते काही मिळविण्यासाठी नव्हे, तर महाराष्ट्र चुकीच्या हातात जाऊ नये म्हणून लढतोय. 79 वर्षांचा तरुण महाराष्ट्र हादरून सोडतोय. ही निवडणूक फक्‍त आमदार करण्याची नाही तर ही निवडणूक महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे. ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला त्या भाजप व शिवसेनेच्या सरकार खाली घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. शरद पवार यांच्या विचाराला साथ दिली पाहिजे, ही साथ देत असताना अतुल बेनके उमेदवार आहेत पण ते 50 टक्‍के बरोबर आहे उर्वरित 50 टक्‍के शरद पवारांच्या विचारांची लढाई आहे, असे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी नमूद केले.

जुन्नर विधानसभा मतदारसंघातील महाआघाडीचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार अतुल बेनके यांच्या प्रचारची सांगता सभा शिरोली बुद्रुक येथे झाली, त्यावेळी खासदार डॉ. कोल्हे बोलत होते. याप्रसंगी उमेदवार अतुल बेनके, विघ्नहरचे अध्यक्ष सत्यशील शेरकर, बाजार समितीचे सभापती संजय काळे, माजी आमदार दिलीप ढमढेरे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, शरद लेंडे, गणपतराव फुलवडे, मनसेचे मकरंद पाटे, कॉंग्रेस अध्यक्ष अशोक घोलप, महिला अध्यक्ष अर्चना भुजबळ, उज्वला शेवाळे, आघाडी घटक पक्षाचे सर्व पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते. सत्यशील शेरकर म्हणाले की, या भागातून लोकसभेप्रमाणे मोठे मताधिक्‍य बेनके यांना देऊ असे आश्‍वासन त्यांनी दिले. संजय काळे म्हणाले की, विरोधक अफवा करतील मात्र त्यावर विश्‍वास ठेऊ नका, असे आवाहन त्यांनी केले.

  • पुढील काळात काळे, शेरकर, बेनके यांच्यामध्ये कधीही फूट पडणार नाही. डॉ अमोल कोल्हे आणि आपण जुन्नर तालुका नंबर 1चा केल्या शिवाय राहणार नाही. पाण्याचा प्रश्‍न सोडविण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शेतकरी वर्गाचे प्रश्‍नांसाठी आपण 41 दिवसांपासून घराबाहेर आहोत. जुन्नर तालुका हेच माझे घर झाले आहे, प्रत्येक गावात मला खूप प्रेम मिळाले. शरद पवार यांच्या विचारांचा वारसा घेऊन मी शेतकरी वर्गाच्या प्रश्‍नांसाठी झटत राहील. जुन्नर तालुक्‍यातील पाण्याचे रक्षण करण्याचे मी वचन देतो.
    – अतुल बेनके, उमेदवार, राष्ट्रवादी कॉंग्रेस, जुन्नर विधानसभा मतदारसंघ

Leave A Reply

Your email address will not be published.