पुणे, दि. 29 -विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात खासगी वाहनांची वाढलेली संख्या आणि अरुंद रस्त्यामुळे शाळांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. परिणामी, या कोडींमुळे मुलांनाही अपघाताचा धोका वाढतो. तसेच शाळेच्या परिसरातही मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. ही बाब लक्षात घेऊन परदेशातील शाळा प्रमाणेच पुण्यातही महापालिकेकडून “स्कूल सेफ झोन’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने शहरातील वाहतूक तज्ज्ञ, वाहतुकीशी संबंधित काम करणाऱ्या संस्था तसेच नागरिकांकडून प्रस्ताव मागविले होते. त्या अंतर्गत 8 प्रस्ताव प्राप्त झाले असून, त्यातील 3 प्रस्ताव अंतिम केले जाणार आहेत. तसेच, या प्रस्तावांची प्रायोगिक अंमलबजावणी डिसेंबर महिन्यापासून केली जाणार आहे. महापालिकेच्या पथ विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब दांडगे यांनी ही माहिती दिली.
काय आहे संकल्पना
शालेय विद्यार्थ्यांचा शाळेत जातानाचा प्रवास सुखकारक व्हावा, तसेच त्यांना शाळेत एकटे जाताना वाहतुकीची अडचण येऊ नये आणि विद्यार्थ्याने वाहतुकीसाठी कुणावरही अवलंबून राहू नये, या उद्देशाने ही संकल्पना राबविली जाणार आहे. त्या प्रकारे शाळेच्या परिसरातील वाहतुकीचे नियोजन केले जाणार आहे. यामध्ये कुठल्याही शाळेच्या परिसरातील 1 किमीचा परिसर आम्हाला विकसित करण्यात येणार असून, ज्यामध्ये 5 ते 12 वी पर्यंतचा कुठलाही विद्यार्थी आरामात सायकलवर किंवा चालत देखील आपल्या शाळेत जाऊ शकणार आहे. यात शाळेच्या परिसरातील रस्ते, वाहनांचे पार्किंग, शाळेपर्यंत पदपथ गर्दीच्या वेळा, शाळेच्या वेळा अशा अनेक बाबींचा समावेश आहे.
असे आहेत नऊ झोन
डेक्कन जिमखाना, हडपसर, लोहगाव-धानोरी, कोथरूड, वडगाव बुद्रुक, पर्वती-बिबवेवाडी, पाषाण, कोंढवा आणि खराडी या झोनचा समावेश आहे. महापालिकेने हे झोन करून त्याबाबत प्रस्ताव मागविले होते. आतापर्यंत आठ लोकांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. येत्या शुक्रवारी या सर्व प्रस्तावांची छाननी करण्यात येणार आहे. ही छाननी मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता, पथ विभागातील प्रमुख अधिकारी आणि वाहतूक पोलीस यांच्या उपस्थितीत केली जाणार असून, त्यानंतर तीन प्रस्ताव अंतिम केले जाणार आहेत. तर त्यानंतर डिसेंबर महिन्यात प्रत्यक्षात या प्रस्तावांची प्रायोगिक अंमलबजावणी करून एक प्रस्ताव अंतिम केला जाणार आहे.