सातारा – लंपी स्किन आजारामुळे गुरुवारी एका दिवसात 14 जनावरांचा मृत्यू झाला. दहा तालुक्यांतील 107 गावांमध्ये लंपी स्किनची लागण झाली आहे. गुरुवारअखेर 1526 जनावरे बाधित आढळली असून 105 जनावरांचा मृत्यू झाला आहे. नियमित औषधोपचाराने 219 जनावरे बरी झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
महाबळेश्वर वगळता इतर तालुक्यांत आजअखेर 1362 गाय, 164 बैल अशा 1526 जनावरांना लंपी स्किनचा प्रादुर्भाव झाला आहे. गुरुवारअखेर 78 गायी, 27 बैल असे 105 पशुधन मृत झाले आहे. आजअखेर 198 गाई व 21 बैल अशी 219 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झालेली आहेत. लंपी स्किनच्या उपचारासाठी आवश्यक सर्व औषधे, शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालयांमध्ये उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात 92 टक्के लसीकरण पूर्ण
विसाव्या पशुगणनेनुसार जिल्ह्यातील गोवर्गीय पशुधनाची संख्या 3 लाख 52 हजार 436 असून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार गुरुवारअखेर बाधित गाव व बाधित गावाच्या 5 किलोमीटर परिघातील एकूण 660 गावांमधील गोवर्गीय 1 लाख 85 हजार 956 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील गोवर्गीय 1 लाख 39 हजार 406 अशा 3 लाख 25 हजार 362 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाले असल्याची माहिती डॉ. संजय शिंदे यांनी दिली.