कराड – मलकापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक सातमधील कॉंग्रेसचे नगरसेवक दत्ता पवार यांचे जुलै महिन्यात झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. गेले चार महिने ही जागा रिक्त असल्याने या जागेसाठी पोटनिवडणूक होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. नुकतेच सर्वजण विनाधनसभा निवडणुकीतून रिकामे झाले असल्याने आता या रिक्त जागेसाठी हालचाली वाढू लागल्या असल्याने सर्वांचे लक्ष या पोटनिवडणुकीकडे लागले आहे.
मलकापूर नगरपंचायतीला “क’ वर्ग नगरपरिषदेचा दर्जा मिळाल्यानंतर जानेवारी महिन्यात पहिलीच पंचवार्षिक निवडणूक पार पडली. निवडणुकीत कॉंग्रेसने नगराध्यक्ष पदासह 15 जागांवर विजय मिळवला. याध्ये आगाशिवनगर मधून प्रभाग क्रमांक सातमध्ये भाजपाचे स्थानिक नेते हणमंतराव जाधव आणि दत्ता सीताराम पवार यांच्यात सामना रंगला होता. हणमंतराव जाधव यांच्यापुढे दत्ता पवार या नवख्या युवकाचे काही चालणार नाही असे वाटत असतानाच या युवकाने निवडणुकीत विजय मिळवित बाजी मारली. या विजयाने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली होती.
नगराध्यक्षा नीलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे यांनी पवार यांना शिक्षण, नियोजन विभागाचे सभापती केले. निवडणुकीनंतर अवघ्या सातव्या महिन्यात त्यांचा भिषण अपघातात मृत्यू झाला. दत्ता पवार यांच्या जाण्याने त्यांची जागा रिक्त झाली आहे. परंतु साऱ्यांचेच विधानसभा निवडणुकीकडे लक्ष असल्याने या रिक्त जागेबाबत कोणी साधी चर्चा केली नाही. मात्र सध्या विधानसभा निवडणूक झाली असून यात राष्ट्रीय कॉंग्रेसचे उमेदवार आ. पृथ्वीराज चव्हाण हे निवडून आले. शिवाय मलकापूर नगरपरिषदेतही कॉंग्रेसचीच सत्ता असल्याने दत्ता पवार यांच्या रिक्त जागेवर कॉंग्रेसचाच उमेदवार निवडून येईल अशी चर्चा सुरू आहे.
त्यामुळे या रिक्त जागेसाठी निवडणूक लागण्याची चिन्हे दिसत आहेत. त्यासाठी निवडणूक आयोगाने हालचाली सुरू केल्या आहेत. कॉंग्रेसकडून पवार यांच्या जागी त्यांच्या पत्नीची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा आहे. भाजपाने अद्याप आपली भूमिका जाहीर केलेली नाही. या पोटनिवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असून विधानसभेनंतर होणारी ही पोटनिवडणूक सध्या चर्चेत आहे. दरम्यान, कोणता उमेदवार असणार याबाबत उत्सुकताही नागरिकांत आहे.