जिल्ह्यातील संस्थाचालक हादरले
पुणे – पुणे जिल्ह्यातील खासगी अनुदानित शाळांमध्ये बोगस शिक्षक भरती झाली असून, यात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा झाला आहे. याप्रकरणी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कसून तपासणी करीत आहे. या प्रकरणातील फिर्यादीची ईडीच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच चौकशी केली. फिर्यादीकडून अधिकाऱ्यांना महत्वाची कागदपत्रेही उपलब्ध झाली असून, या प्रकरणात काही अधिकारी आणि संस्थाचालक “ईडी’च्या टापूत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
शिक्षक भरतीला बंदी असताना बनावट कागदपत्रे तयार करुन शिक्षक भरती करण्यात आली. शासनाचे नियम धुडकावून ही भरती झाली. याबाबत पुणे जिल्हा परिषदेतील विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात 19 ऑक्टोबर 2019 रोजी फिर्याद नोंदविली आहे. त्याची दखल घेऊन तत्कालीन शिक्षणाधिकारी, शिक्षक, मुख्याध्यापक, संस्थाचालक यांचा समावेश असलेल्या एकूण 28 जणांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत.
आर्थिक गुन्हे शाखेने या बोगस शिक्षक भरतीचा बारकाईने तपास केला होता. घोटाळ्यातील आणखी काही शाळा, शिक्षक, अधिकारी यांचीही माहिती त्यांना मिळाली होती. शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी आर्थिक गुन्हे शाखेने केली होती. मात्र, शालेय शिक्षण विभागाने ही परवानगी नाकारली. त्यामुळे या प्रकरणाचा तपासच थांबला होता. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने “ईडी’ ला बोगस शिक्षक भरती प्रकरणात लक्ष घालण्याचा आग्रह केला असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. “ईडी’च्या रडारवर काही अधिकारी, संस्थाचालकही असण्याची शक्यता आहे. जसजसे पुरावे हाती लागतील, त्यानुसार “ईडी’कडून काही जणांचा “फास’ आवळला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. +
फिर्यादीची सहा तास चौकशी
“ईडी’कडून या प्रकरणाचा “होमवर्क’ सुरु आहे. त्यांनी फिर्यादी भुजबळ यांना नुकतेच मुंबईला चौकशीसाठी बोलावले होते. यात पाच-सहा तास भुजबळ यांची चौकशी करण्यात आली. प्रकरण कसे घडले, कोणा कोणाचा यात हात आहे, आर्थिक घोटाळा कसा झाला, याबाबत भुजबळ यांच्याकडे चौकशी करण्यात आल्याचे समजते. भुजबळ यांनी प्रकरणाची सर्व माहिती, पुरावे, आवश्यक ती कागदपत्रे “ईडी’ला सादर केली आहेत. पुढच्या आठवड्यात भुजबळ यांना पुन्हा “ईडी’च्या चौकशीसाठी सामोरे जावे लागणार आहे. यावेळी आणखी काही पुरावे सादर करण्यात येणार आहेत.