सिंहगडरस्ता, दि. 4 (प्रतिनिधी) – हिंगणे खुर्द येथे रघुनंदन सह. सोसायटीमध्ये “रिबेल फुड्स प्रायव्हेट लिमिटेड’ या ऑनलाइन अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या कंपनीचे किचन आहे. सकाळी 08:00पासून ते रात्री 12:00पर्यंत हे किचन सुरू असल्याने याचा त्रास होत असल्याची तक्रार स्थानिक रहिवाशांकडून महापालिका, अग्निशमन केंद्र, पोलीस प्रशासन यांच्याकडे केली आहे.
या किचनमध्ये सुरक्षेच्या कोणत्याही उपाय योजना केलेल्या दिसत नाही. सहा व्यवसायिक सिलिंडर ठेवण्यात आलेल्या ठिकाणीच थ्री फेज कनेक्शन आहे. गॅस सिलिंडरपासून थोड्याच अंतरावर जनरेटर सुरू असतो. ही सोसायटी साधारण 20 वर्षे जुनी असल्याने येथील वायरिंगही जुनी झाल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. यातून शॉर्टसर्किट तसेच सिलींडर स्फोट अशी दुर्घटना घडण्याचा धोका आहे.
या किचनमध्ये शुद्ध हवा आतमध्ये येण्यासाठी आणि गरम हवा बाहेर जाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली आहे, त्यामुळे जनरेटर सुरू करण्यात येऊन त्याचाही फार मोठा आवाज आणि प्रदूषण होत आहे. या आवाजाचा त्रास होत असल्याचे रहिवाशी सांगतात.
रिबेल फुडसला फायरचे ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे. रहिवाशांची तक्रार असेल तर त्यांना सुरक्षेचे सर्व नियम पाळण्यास सांगितले जाईल. आणि चुकीचे काही आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.
– प्रभाकर उमरटकर, सुरक्षा अधिकारी,अग्निशम दल-सिंहगड रस्ता
रिबेल फुडस आस्थापना ऑनलाइन पद्धतीने फूड लायसन्स घेतात जर काही प्रदूषणाची तक्रार असेल तर नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा. सदर ठिकाणी पाहणी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.
– प्रताप जगताप, मुख्य अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियमक मंडळ
आम्ही आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत. आमचे काम नियमानुसारच सुरू आहे, तरीही सोसायटीतील रहिवाशांची काही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधावा त्यातून मार्ग काढण्यात येईल आणि सोसायटीतील रहिवाशांची सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. नियमांतर्गत सर्व कामे करीत आहोत.
– सचिन अंबिके, संचालक, रिबेल फूड
आम्ही आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतलेल्या आहेत. आमचे काम नियमानुसारच सुरू आहे, तरीही सोसायटीतील रहिवाशांची काही तक्रार असल्यास आमच्याशी संपर्क साधावा त्यातून मार्ग काढण्यात येईल आणि सोसायटीतील रहिवाशांची सुरक्षेला प्राधान्य देण्यात येईल. नियमांतर्गत सर्व कामे करीत आहोत.
– सचिन अंबिके, संचालक, रिबेल फूड