US Hindu Temple : अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात आलेल्या भव्य मंदिरात 22 जानेवारीला रामलल्लाचा अभिषेक सोहळा पार पडणार आहे. याचा उत्साह संपूर्णदेशात पाहायला मिळत आहे. पंरतु, प्रभू श्रीरामाच्या मंदिराच्या उदघाटनाचा उत्साह केवळ भारतातच नाही तर सातासमुद्रापार देखील पाहायला मिळत आहे. सातसमुद्रापार असलेल्या अमेरिकेतील हिंदू मंदिरांमध्येहीराम मंदिराच्या उदघाटनाचा उत्सव साजरा होणार आहे. आठवडाभर हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. मंदिरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने ही माहिती दिली.
हिंदू मंदिर एम्पॉवरमेंट कौन्सिल (HMEC) च्या तेजल शहा यांनी याविषयी माहिती दिली. आम्ही या कार्यक्रमाचा एक भाग आहोत हे आमचे भाग्य आहे. शतकानुशतके प्रतीक्षा आणि संघर्षानंतर आमचे स्वप्नातील मंदिर साकार झाले असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले. तसेच अमेरिका आणि कॅनडातील प्रत्येकजण भावूक आहे. प्रत्येकाच्या मनात आदराची भावना आहे आणि ते आपल्या मंदिरात प्रभू श्री रामाच्या अभिषेकची वाट पाहत आहेत.” अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.
हिंदू टेंपल एम्पॉवरमेंट कौन्सिल (HMEC) ही यूएस मधील 1,100 हिंदू मंदिरांची सर्वोच्च संस्था आहे. याविषयी शाह यांनी,” उत्तर अमेरिकेतील लहान-मोठ्या मंदिरांमध्ये आठवडाभर चालणारा उत्सव 15 जानेवारीपासून कीर्तन आणि पूजाविधीच्या माध्यमातून सुरू होईल आणि अयोध्येतून राम मंदिराच्या उद्घाटनाच्या थेट प्रक्षेपणाने त्याची सांगता होईल.” अशी माहिती दिली. अयोध्येतील रामजन्मभूमीवर उभारण्यात येत असलेल्या भव्य मंदिरात 22 जानेवारी रोजी रामललाचा (भगवान रामाचे बालस्वरूप) अभिषेक होणार आहे.
हजारो लोक प्राणप्रतिष्ठा सोहळा पाहणार
एचएमईसीचे अध्यक्ष शाह म्हणाले की, आतापर्यंत मिळालेल्या प्रतिसादावरून हजारो लोक अभिषेक सोहळा पाहतील अशी अपेक्षा आहे. ते म्हणाले, “ आतापर्यंत उत्तर अमेरिकेतील डझनभर मंदिरांनी 15 जानेवारीपासून पुजाऱ्यांकडून कीर्तन सुरू करण्यास संमती दिली आहे. 21-22 जानेवारीला होणाऱ्या मुख्य कार्यक्रमांना निम्म्याहून अधिक मंदिरांनी संमती दिली आहे. “दर आठवड्यात 100 हून अधिक मंदिरे कार्यक्रमांसाठी नोंदणी करत आहेत,” शाह म्हणाले.
प्रभू रामाच्या 108 नामांचा जप केला जाईल
15 जानेवारीच्या कार्यक्रमाची सुरुवात पुजार्यांच्या रामनाम संकीर्तनाने होईल, असे शाह म्हणाले. राम नाम संकीर्तन हे वाल्मिकी रामायणात वापरलेले प्रभू रामाच्या १०८ नावांचे जप आहे. यानंतर अटलांटा येथील प्रसिद्ध कलाकार विनोद कृष्णन यांचे भजन होणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते प्रभू रामाचे काही लोकप्रिय नवीन भजन गाणार आहेत. शाह म्हणाले की, 21 जानेवारीला मंदिरे उजळून निघतील. अयोध्येत होणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मंदिरांमध्ये थेट प्रक्षेपण करण्याची आणि प्राणप्रतिष्ठेच्या मुख्य मुहूर्तावर शंख फुंकण्याची योजना आहे, त्यानंतर प्रसादाचे वाटप केले जाईल. कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक मंदिराला श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून सहभाग प्रमाणपत्र आणि प्रसाद दिला जाईल.