पिंपरी – शहराच्या विविध भागात तब्बल 433 अनधिकृत होर्डिंग असून याचा वाद न्यायालयात प्रलंबित असून गेल्या वर्षभरात महापालिकेने 127 अनधिकृत होर्डिंगवर कारवाई केली. महापालिकेने तयार केलेले होर्डिंग धोरण शासनाने विखंडित केले. त्याऐवजी राज्य शासनाने 9 मे 2022 रोजी राज्यातील महापालिकांसाठी एक धोरण केले. त्याला एक वर्ष पूर्ण होत आले. मात्र, महापालिकेकडून या धोरणाची अद्यापही अंमलबजावणीच केली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे होर्डिंगधारकांचे राजकीय लागेबांधे सर्वसामान्यांच्या जिवावर उठत असून चौका-चौकातील होर्डिंग नव्हे तर मृत्यूचे सांगाडे, आहेत की काय? अशी भावना जनसामान्यांची होऊ लागली आहे.
अनधिकृत होर्डिंगमुळे घडलेली घटना न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली जाणार आहे. तातडीने सुवावणी घेण्याची विनंती केली जाईल. न्यायालयाच्या आदेशानुसार पुढे कारवाई केली जाईल. शासनाच्या होर्डिंग धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी त्वरीत पाऊले उचलली आहेत. पुढील तीन ते चार महिन्यात त्याची अंमलबजावणी होईल.
– शेखर सिंह, आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका.
राजकीय लांगेबांधे
होर्डिंग व्यवसायात शहरातील विविध राजकीय पक्षांतील मंडळींचे लागेबांधे आहेत. काही माजी नगरसेवकांचा या व्यवसायाशी संबंध आहे. तसेच होर्डिंगला परवानगी देण्यासाठी नगरसेवकांचा अधिकाऱ्यांवर अनेकदा दबावही असतो. या दबावातूनच अधिकारीही होर्डिंगला बिनभोबाट मान्यता देतात. राजकीय लोकांचे लागेबांधे असल्यानेच शहरातील अनधिकृत होर्डिंगचे प्रमाण वाढल्याचा आरोप होत आहे. मात्र, शहरातील अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग कुठे तरी थांबवून लवकरात-लवकर शासनाची होर्डिंग धोरणाची अंमलबजावणी करावी. शहराचे सौदर्य अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी शहरवाशीयांची अपेक्षा आहे.
पालिकेने अशा घटनांमधून बोध घ्यावा
1 जून 2018 ला पुनावळे येथे जाहिरात होर्डिंग अंगावर कोसळून पायी जाणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला होता. पुणे-आळंदी रस्त्यावर दिघी, दत्तनगर येथे 29 एप्रिल 2022 मध्ये जाहिरात होर्डिंग कोसळून दुकान व घरावर पडले होते. सुदैवाने त्यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. 5 ऑक्टोबर 2018 मध्ये पुण्यातील जुना बाज़ार येथील चौकात जाहिरात होर्डिंग कोसळून तीन जणांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले होते. आत किवळेत पाच जणांचा मृत्यू तर तिघे जखमी झाले आहेत. या घटनांमधून पालिकेने बोध घेऊन ठोस कारवाई करावी.
किवळे येथे वादळी वाऱ्यासह पावसापासून बचावासाठी बांधकाम प्रकल्पावर मजुरी करणारे मजूर पंक्चरच्या दुकानाखाली बसले होते. दुकानावर होर्डिंग कोसळल्याने दुकानात आडोसा घेतलेल्या पाच जणांवर काळाने घाला घातला. या घटनेमुळे शहरातील अनधिकृत होर्डिंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. गोर-गरीब घरातील कर्ती महिला, पुरूष गेल्याने त्यांच्या कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
नेत्यांचे वाढदिवस असो, सांस्कृतिक, धार्मिक, शैक्षणिक यासह कोणतेही कार्यक्रम असो होर्डिंग लावण्याची मोठी क्रेझ आली आहे. शहरात 1 हजार 407 अधिकृत होर्डिंग असून 433 होर्डिंग अनधिकृत आहेत. किवळेतील कोसळलेले होर्डिंगही अनधिकृत होते.
न्यायालयाच्या आदेशामुळे कारवाई करता आली नाही. अनधिकृत होर्डिंग उभे राहत असताना महापालिका प्रशासनाने फक्त बघ्यांची भूमिका घेतली की “अर्थपूर्ण” कानाडोळा केला, असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. तसेच शहरातील प्रत्येक चौका-चौकात मोठ-मोठे 500 किलोचे होर्डिंग उभारण्यास पालिका परवानगी देत असतानाच चौकात सिग्नलसाठी थांबणाऱ्या नागरिकांना मात्र, आता चौकातील होर्डिंगची धास्ती वाटू लागली आहे.