पारगाव (वार्ताहर) – आठराविश्व दारिद्य्र, कुटुंबात शिक्षणाचा अभाव पाचवीला पुजलेली गरिबी. पण हार न मानता पारगाव (ता. दौंड) येथील संकेत अंबादास मोरे यांनी एमबीबीएसच्या प्रथम वर्षात मेरिटमध्ये स्थान मिळविले असून बारामती मेडिकल कॉलेजमध्ये दुसर्या वर्षाला शिक्षण घेत आहेत. अंबादास मोरे यांनी दगड विटांची रास रचतारचता तिनही मुलांच्या शिक्षणाची ही रास रचली. संकेतने 10वी नंतर 11 वी12 पर्यंतचे शिक्षण पुणे येथील गरवारे कॉलेजमध्ये पूर्ण केले. संकेत याची डॉक्टर होण्याची प्रबळ इच्छा पाहून वडील अंबादास यांनी परिस्थिती नसताना ही त्यास नांदेड या ठिकाणी नीटच्या अभ्यासासाठी पाठविले. नांदेड या ठिकाणी नीट परीक्षेचा आभास करीत असताना संकेतला अनेकवेळा पैशांची चणचण भासत असे आणि घरच्या परिस्थितीची जाणीव असल्याने प्रत्येक वेळेस घरी पैसे मागणे संकेतला पटत नसे. त्यामुळे अनेक वेळा उपाशी रहावे लागत असे.त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर झाला व एके दिवशी त्याच्या रक्ताची पातळी खाली येऊन 5:1 वर आली व त्याला अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते व रक्ताच्या पाच बाटल्या दिल्यानंतर त्याच्या प्रकृतित सुधारणा होत गेली. इच्छा शक्तीच्या जोरावर संकेत ने शून्यातून विश्व निर्माण केले. प्रतिकूल परिस्थिती ही त्याला अडवू शकली नाही. उपासमारीचे दिवस काढून संकेत मोरे याने अहोरात्र अभ्यास करून नीट परीक्षेत 512 गुण मिळवून यश संपादन केले व बारामती येथील शासकीय मेडिकल कॉलेज मध्ये नंबर मिळवून आत्मविश्वास, जिद्द,चिकाटी च्या जोरावर त्याच्या स्वप्नातील डॉक्टर या पदाला गवसणी घालत आहे. प्रतिक करतोय नोकरी अंबादास यांना दोन मुले व एक मुलगी थोरला प्रतीक व धाकटा संकेत व बहीण शुभांगी या तिघांचे दहावी पर्यंतचे शिक्षण पारगाव येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये झाले. आता प्रतीक याने बि. फार्मसी पूर्ण करून जीपीएटी 2023 ही परीक्षा मेरिटमध्ये उत्तीर्ण असून तो डॉक्टर ऑफ फार्मसी करीत आहे. सध्या पुणे येथे आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमध्ये घराला मदत व्हावी म्हणून काम करीत आहे. बहीण शुभांगीही बि. कॉम चे शिक्षण घेत आहे.