लंडन न्यायालयाचा 70 वर्षांनी निकाल, पाकला झटका
लंडन: फाळणीच्यावेळी असणारी निझामाची संपत्ती आणि लंडनमधील बॅंक खात्यात असणाऱ्या रकमेवर पाकिस्तान सांगत असलेला दावा येथील उच्च न्यायलयाने फेटाळून लावला. त्यामुळे निजामाचा हा खजिना भारताच्या हवाली केला जाणार आहे.
लंडनमधील नेटवेस्ट बॅंकेमध्ये असणाऱ्या 350 लाख डॉलर्सच्या मालकीवरून असणाऱ्या या लढ्यात निझामाचे आठवे वंशज राजकुमार मुक्कर्रम झा आणि त्यांचे लहान बंधू मुख्खकम झा यांनी भारताला साथ दिली.
हा खटला 70 वर्षांपासून ब्रिटनच्या उच्च न्यायालयात लढवला जात होता. निजामाच्या या संपत्तीवर भारत आणि निजामांच्या उत्तराधिकाऱ्यांचाच अधिकार असल्याचे न्यायलयाने स्पष्ट केले. भारताच्या फाळणीवेळी हैदराबादचे सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांनी लंडनच्या नेटवेस्ट बॅंकेत एक लाख सात हजार 940 पाऊंड म्हणजे सुमारे आठ कोटी 87 लाख रुपये जमा केले होते. त्याचे व्याज धरून ही रक्कम तीन अब्ज आठ कोटी 40 लाख रुपये झाली आहे.
लंडनच्या रॉयल कोर्ट ऑफ जस्टिसचे जज मार्कस स्मिथ यांनी यावर निर्णय दिला आहे. हैदराबादचे सातवे निजाम उस्मान अली खान यांच्या मालकीची ही संपत्ती होती. त्यांच्यानंतर त्यांचे वंशज आणि भारत या संपत्तीचा दावेदार असेल, असे मार्कस स्मिथ यांनी म्हटले आहे.